निवडणूक कामातील 11,248 कर्मचारी ईव्हीएमऐवजी करणार बॅलेटने मतदान:मतदानाच्या आठवडाभर आधीच 13 नाेव्हेंबरला बंद होणार मतपेटी‎

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले ११ हजार २४८ अधिकारी-कर्मचारी इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट) मतदान करणार आहेत. हे मतदान प्रत्यक्ष मतदान असलेल्या २० नोव्हेंबर या तारखेच्या एक आठवडाआधीच केले जाणार असून १३ नोव्हेंबरला मतपेटी बंद केली जाणार आहे. निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी त्यांना नियुक्त मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे टपाल मतपत्रकांचा (पोस्टल बॅलेटस्) आधार घेऊन त्यांचे मतदान करवून घेतले जाते. मागील लोकसभा निवडणुकीवेळीही ही पद्धत अस्तित्वात होती. परंतु, पोस्टल बॅलेटसाठीचा अर्ज भरुन दिल्यानंतरही अनेक बीएलओंना टपाल मतपत्रिका प्राप्त झाल्या नव्हत्या. त्यामुळे या वेळी ही बाब कटाक्षाने राबवली जात आहे. या निवडणुकीत ११ हजार २४८ कर्मचारी निवडणुकीच्या कामात वेगवेगळी कर्तव्ये पार पाडत आहेत. त्यांच्या मतदानाची सोय पोस्टल बॅलेटने करण्यात आली आहे. मुळात येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणादरम्यान संबंधितांना मतपत्रिका देण्यात येणार असून त्यांची मतदानाची सोय विधानसभा मतदारसंघनिहाय सुविधा केंद्रात केली आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून प्रथम प्रशिक्षणादरम्यान पोस्टल बॅलेटने मतदान करण्यासाठी फॉर्म १२ भरून घेण्यात आला आहे. हा फॉर्मवरून अधिकारी-कर्मचारी यांना त्यांनी विनंती केलेल्या विधानसभा मतदारसंघाची मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. तसेच या मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी सुविधा केंद्राची निर्मितीही करण्यात येते. दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान आगामी १२ व १३ नोव्हेंबर रोजी या मतपत्रिका त्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

Share