13 व्या शतकातील “आनंदेश्वर’मुळे लासूरची ओळख,:हेमाडपंती शैलीत काळ्या दगडात बांधकाम, मंदिराची रचनाही असामान्य; मुख्य गर्भगृहात आहे शिवमंदिर

दर्यापूर शहरापासून ११ किमी. अंतरावर असलेल्या लासूर या गावातील १३ व्या शतकात बांधलेले आनंदेश्वर मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून, या शिव मंदिरामुळेच या गावाला खरी ओळख मिळाली आहे. महाशिवरात्री, श्रावण सोमवारी हे मंदिर व लासूर गाव भाविकांच्या गर्दीने गजबजलेले असते. बाबा आनंदेश्वरच आमचे पाठीराखे आहेत, असे येथील गावकरी सांगतात. ११०० लोकसंख्येच्या या काहीशा आडवळणाला असलेल्या गावात एरव्ही कोणी फिरकलेही नसते. परंतु, असामान्य रचनेच्या या मंदिरामुळे गावाला खरी ओळख मिळाली आहे. सर्वात मनोरंजक व दगडी मंदिरांपैकी एक म्हणजे लासूर गावातील आनंदेश्वर मंदिर. पूर्णा नदीच्या काठावर उंच जमिनीवर काळ्या दगडांत हे मंदिर बांधले आहे. ते दूरवरून एखाद्या किल्ल्यासारखे दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवांचा राजा रामचंद्र यांनी बांधले होते. परंतु, त्यांचा उद्देश, बांधकाम आणि परिसरात काळ्या दगडाची उपलब्धता नसल्यामुळे ते येथे आले कुठून असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. मात्र, आम्ही या गावातील रहिवासी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.. हे मंदिर सामान्य हेमाडपंती शैलीत बांधले असले तरी, मंदिराची रचना खूपच असामान्य आहे. दूरून किंवा उंचावरून मंदिर तीन पाकळ्यांच्या फुलासारखे दिसते. ज्याच्या चौथ्या बाजूला तुलनेने लहान प्रवेशद्वार आहे. तीन गर्भगृहे आणि मध्यभागी स्वर्ग मंडप म्हणून ओळखला जाणारा एक उघडा सभा मंडप आहे. ही गोल रचना दृश्यमान आनंद देते. ज्याच्या पार्श्वभूमीत गुंतागुंतीचे कोरीव खांब आहेत तर अग्रभागी निळे आकाश दिसते. आणखी एक आकर्षक वास्तुशिल्पीय तपशील म्हणजे संपूर्ण रचना धरण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे खडक एकमेकांशी जोडलेले दिसतात. शिवमंदिर मुख्य गर्भगृहात वसलेले आहे आणि १२ खांबांनी त्याला आधार दिला आहे. छताच्या तपशीलात वेगवेगळ्या रूपात यक्षांची एक सामान्य थीम दिसते. {उर्वरित. पान ४ लोकसंख्या 1100 अंतर 63 किमी कनेक्टिव्हिटी : एसटी, खासगी वाहन, ऑटो. विशेष ओळख : खुला मंडप असलेले आनंदेश्वर मंदिर {या मंदिरात ऋषी, अप्सरा, पुराणातील दृश्ये आणि खांबांवर आणि कॉर्निसवर देव-देवतांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. शासनाने निधी देऊन पर्यटन स्थळ बनवावे; ग्रामस्थांची मागणी वैशिष्ट्यपूर्ण आनंदेश्वर मंदिर असलेले लासूर गाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आले तर आम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. शासनाने भरीव निधी देऊन या गावाला पर्यटन स्थळ घोषित केल्यास येथे सहज रोजगार मिळेल. जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने येथे विविध मनोरंजक पार्क उभारता येतील. जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांना एक सुंदर प्राचीन मंदिर पर्यटन स्थळाच्या रुपात बघता येईल. मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असली तरी अद्याप या गावाचा विकास झाला नाही. मंदिरही दिवसेंदिवस मोडकळीस येत आहे. ते बघता शासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Share