प्रशिक्षणासाठी राज्यातील 147 निवडणूक अधिकारी अमरावतीत:5 दिवस गिरवणार धडे, पहिल्यांदाच असे आयोजन

आगामी विधानसभा निवडणुकीची प्रशासकीय तयारी करण्याच्यादृष्टीने येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधिनीमध्ये राज्यभरातील निवडणूक व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये विविध ठिकाणांहून आलेले १४७ निवडणूक अधिकारी सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण पाच दिवस चालणार आहे. निवडणूकविषयक अशा प्रकारच्या शिबिरात एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यभरातील अधिकारी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज, रविवारी सकाळी या शिबिराचे उद्घाटन झाले. भारत निवडणूक आयोगाचे अतिरिक्त राज्य निवडणूक अधिकारी प्रदीप पी. अमरावती जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय अपर आयुक्त संजय पवार, प्रबोधिनीचे संचालक अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदींनी दीप प्रज्वलीत करुन या शिबिराचे उद्घाटन केले. शिबिरात राष्ट्रीय पातळीवरील साधन व्यक्ती तथा भारत निवडणूक आयोगाच्या प्रदेश कार्यालयाचे प्रधान सचिव एस.बी. जोशी, अवर सचिव संदीप कुमार आणि सचिव बिनोद कुमार, जम्मू-काश्मीरचे चंदकिशोर शर्मा, उत्तराखंडचे अखिलेशकुमार शर्मा, मध्यप्रदेशचे पी. एन. सनेसर, उत्तरप्रदेशचे हिमांशू गौतम, मेघालयच्या अनिता खारपोर अशी दिग्गज मंडळी निवडणूकविषयक धडे देत आहेत. यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीअंती निकाल घोषित करण्यापर्यंतच्या सर्वच प्रक्रियांचा समावेश आहे. येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आणि त्याच विभागाचे नायब तहसीलदार प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वात हे शिबीर पुढे जात आहे.

Share

-