भाजपसाेबत 16 वर्ष राहूनही एकही जागा रिपाईला दिली नाही:पिंपरी, केज, माळशिरसची जागा आम्हाला द्यावी- परशुराम वाडेकर

भाजपला प्रतिकूल वातावरण असताना त्यांच्यासाेबत आंबेडकरी जनता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) साेबत आली व मागील 16 वर्ष त्यांना साथ दिली. परंतु यादरम्यान एकही जागा भाजपने रिपाईला विधानसभा निवडणुकीत न साेडल्याने कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याची भावना पक्षात निर्माण झाली असून समाजात देखील नाराजी असल्याची भावना रिपाईचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. वाडेकर म्हणाले, आरपीआयने राज्यात चेंबूर, पिंपरी, माळशिरस, केज, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, पुण्यातील वडगावशेरी, कॅन्टमन्मेंट, वडगावशेरी आदी ठिकाणावरील 10 ते 12 जागांची मागणी केली आहे. परंतु भाजपकडून त्याबाबत वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात पक्षाने भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी वेळाेवेळी सहकार्य केले. आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर काहीतरी तडजाेड करणे आवश्यक आहे या विचारातून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या लाेकांनी राजकीय पक्षांशी युती करण्याचे धैर्य रामदास आठवले यांनी दाखवले. परंतु पक्षातील कार्यकर्त्यांना याेग्य ते प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने नाराजी आहे. आमच्या पक्षाला लाेकसभा निवडणुकीत देखील संधी मिळालेली नाही. पक्षाची ताकद कमी हाेत असून भाजपने रिपाई कार्यकर्त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. मागील निवडणुकीत आम्हाला जागा साेडल्याचे सांगत, भाजपने त्यांचेच उमेदवार राम सातपुते, पप्पू कलानी उभे करुन निवडून आणले. पुण्यातील कॅन्टान्मेट विधानसभा मतदारंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यात आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहे. त्यामुळे याठिकाणी आम्हाला निवडणुक लढण्याची संधी मिळावी. मी तीनवेळा विधानसभा निवडणुक लढवली असून या मतदारसंघात तीन वेळा तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेली आहे. भाजपने आंबेडकरी चळवळीतून आलेल्या रिपाईच्या कार्यकर्त्यास उमेदवारी दिली तर आंबेडकरी समाजात महायुती बद्दल सकारात्मक संदेश जाईल. यामुळे पुणे जिल्हयासह पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला माेठा फायदा हाेईल. यावेळेस आम्हाला संधी न मिळाल्यास त्याचे परिणाम निवडणुकीत झाल्याशिवाय रहाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Share

-