परदेशातील नातेवाईकांची दिवाळी यंदाही होणार ‘गोड’:फराळाचे पदार्थ परदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसची पार्सल सुविधा

परदेशातील नातेवाईकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा म्हणून फराळ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी टपाल विभाग यंदाही सज्ज झाला आहे. दिवाळीनिमित्त पुणे टपाल विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. फराळाचे पदार्थ दिल्यानंतर ते नाममात्र किमतीमध्ये पॅकेजिंग करून माफक दरात परदेशात पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली. दिवाळी सणानिमित्त पुणे टपाल विभाग राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती रामचंद्र जायभाये यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्यवस्थापन विभागाच्या संचालक सिमरन कौर उपस्थित होत्या. जायभाये म्हणाले की, दिवाळीचा फराळ करून तयार आहे पण, तो पाठविण्याचा मुहूर्त लागत नाही. तसेच आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयामध्ये येऊ शकत नाहीत, अशा नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थांचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील. गेल्या वर्षी साडेसात हजार किलो फराळ पाठवला…७ नोकरी आणि शिक्षणानिमित पुण्यातून परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परदेशामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येकालाच दिवाळीच्या सणासाठी भारतामध्ये आणि पुण्यामध्ये येणे शक्य होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाठवून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुणे टपाल विभागाने ही जबाबदारी उचलली आहे. शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवाळी फराळ परदेशामध्ये पाठविण्याची सुविधा तसेच तेथे फराळाचे पॅकिंग करण्याची सोयही उपलब्ध आहे. टपाल विभागाने मागील वर्षी दिवाळीनिमित 7 हजार 500 किलो फराळ पुण्यातून परदेशात अगदी वेळेत आपल्या प्रियजनापर्यंत पाठविण्याचा विक्रम केला आहे. … या पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल पॅकिंगची सुविधा पुणे शहरातील जि. पी. ओ., पुणे शहर मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड ईस्ट, मार्केट यार्ड, पर्वती तसेच इतर मोठ्या पोस्ट ऑफिसेसमध्ये फराळाच्या पदार्थाच्या बॉक्सचे पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्या‌द्वारे काही मिनिटांमध्ये फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग करून हा बॉक्स लगेचच परदेशात पाठविला जाणार आहे. आजपासून ते दिवाळीपर्यंत फ्री पिकअप सेवा देण्यात येणार असल्याचे रामचंद्र जायभाये यांनी सांगितले.

Share

-