ठाकरे गटातून येणारच, तुमच्याकडे किती शिल्लक राहतील?:शरद पवारांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी प्रवेश करत आहेत. यातील बहुतांश भाजपमधून जात असल्याचे दिसत आहे व त्यानंतर अजित पवारांच्या पक्षातून जात आहेत. यावर शरद पवार म्हणाले होते की आता महाराष्ट्रातील सत्ता त्यांच्या हातातून काढून घ्यावी लागले. शरद पवारांच्या या वक्तव्यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ज्यांची हयात संपूर्ण फोडाफोडीत गेली, त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. मात्र त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. येणाऱ्या विधानसभेत मोठे इनकमिंग भाजपमध्ये होईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून येतीलच, मात्र शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे, असा टोला देखील विखे पाटलांनी लगावला आहे. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील शरद पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले. तुम्ही काय परिवर्तन केले. निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. निळवंडे धरणाचे चार वेळा भूमिपूजन केले. समन्यायी पाणी वाटपाचे भूत देखील यांच्याच काळात राज्यावर आले. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत, यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, बाबा सिद्दिकी यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. ते एक चांगले व्यक्तिमत्व होते. गेल्या आठवड्यातच आमची भेट झाली होती. अशा घटनांमध्ये मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचेल गेले पाहिजे. फडणवीस यांचा राजीनामा मागून या घटनेचे राजकारण नका करू हीच इच्छा, असे विखे पाटील म्हणाले.

Share

-