हिंगोली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप:मुंबईत सत्कार, राष्ट्रीय पोषण महिन्यात 18 लाख नोंदीसह उत्कृष्ठ कामगिरी

राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत हिंगोली जिल्हयाने ११९७ अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल १८ लाख नोंदी घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप देण्यात आली. मुंबई येथे रविवारी ता. १३ एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. हिंगोली जिल्हयात महिला बाल कल्याण विभागाने राष्ट्रीय पोषण अभियानात उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. सप्टेंबर महिन्यातील पोषण माह अभियानात ११९७ अंगणवाड्यांमधून बालकांच्या आरोग्य सोबतच गरोदर व स्तनदामातांसाठी मार्गदर्शन, दररोज नवीन रेसीपीच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार देणे यासह इतर उपक्रम राबविण्यात आले. हिंगोली जिल्हयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ तसेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी सहा प्रकल्पांमधील अंगणवाड्यांमधून हे उपक्रम राबविले आहेत. दरम्यान, जिल्हयात राबविण्यात आलेल्या या उपक्रमांच्या वेळोवेळी नोंदीही घेण्यात आल्या आहेत. जिल्हयाने राज्यात सर्वात जास्त उपक्रम राबवून त्याच्या १८ लाख नोंदी घेत राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेच्या या कामगिरी बद्दल मुंबई येथे रविवारी १३ मंत्री अदिती तटकरे, सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे यांच्या हस्ते अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी सहा प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह विवेक वाकडे, डुकरे यांची उपस्थिती होती. महिला बालकल्याण विभागाची यापुर्वीही कामगिरी सरस जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने यापुर्वीही आयुक्तालयाकडून दिलेल्या सुचनांनुसार कामे करून सरस कामगिरी केली आहे. आधार व्हेरीफिकेशन, एकसमान रंगरंगोटी, धुरमुक्त अंगणवाडी, पोषण ट्रॅकरमध्येही यापुर्वी राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत.

Share

-