एटीएम फोडीसाठी लातूरमधून चोरला पिकअप:हिंगोली पोलिसांनी खाक्या दाखवताच चालकाने काढला पळ

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एटीएम फोडण्यासाठी आणलेले पिकअप वाहन लातूर येथील असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.त्यामुळे हट्टा पोलिसांचे पथक लातूूरकडे रवाना झाल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एका एटीएम जवळ पिकअप वाहन गुरुवारी ता. 17 पहाटेच्या सुमारास संशयीतरित्या उभे असल्याचे औंढा नागनाथ पोलिसांना गस्तीवर असतांना दिसून आले होते. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार इम्रान शेख यांच्यासह पोलिसांच्या पथकाने चालकाकडे चौकशी सुुरु केली असता चालकाने वाहनासह पळ काढला. या वाहनात चौघे जण बसले होते. त्यानंतर औंढा नागनाथ पोलिसांनी तातडीने हट्टा, कुरुंदा, वसमत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाला. दरम्यान, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार इम्रान सिद्दीकी, कांबळे, लाखाडे यांच्या पथकाला पिकअप बाबत माहिती मिळाल्यानंतर या पथकाने पाठलाग सुरु केला. त्यानंतर संशयीत चोरट्यांनी पिकअप वाहन बोराळा शिवारात सोडून अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात कटर, मोठी पकड व इतर साहित्य मिळून आले आहे. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांनी पिकअप वाहनावरून मालकाचा शोध सुरु केला असता सदर वाहन लातूर येथून तीन दिवसांपुर्वी चोरीला गेले असून त्याबाबत लातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार आता चोरटे लातूर भागातील असल्याच्या संशयावरून पोलिसांची दोन पथके लातूरकडे रवाना झाली आहेत. याभागात यापुर्वी एटीएम फोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

Share

-