लोकशाही बळकट करण्यासाठी चला मतदान करू या..:100 टक्के मतदानासाठी प्रशासनाचे प्रयत्न- जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील मतदारांनी उत्साहपूर्वक मतदान करून लोकशाही बळकटीकरणासाठी आले योगदान दिले पाहिजे. नवमतदारांसह सर्वच मतदारांनो लोकशाही बळकट करण्यासाठी चला मतदान करू या, अशा शब्दात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हयातील ९.७४ लाख मतदारांना मतदानासाठी साद घातली आहे. हिंगोली जिल्हयात हिंगोली, कळमनुरी, वसमत विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुक होत आहे. त्यासाठी आदर्श अचारसंहिता लागू झाली असून मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून देखील युध्द पातळीवर तयारी केली जात आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाकडून निवडणूक प्रक्रियेची तयारी केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण १०१५ मतदान केंद्रांवर ९.७४ लाख मतदार मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी सतर्क झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात नव मतदारांसाठी सर्वच मतदारांनी १०० टक्के मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी मतदार जनजागृती केली जात आहे. तर जिल्हयातील २२ हजार नवमतदारांनी आपले मतदान करत, आई-वडीलांना मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत पोहचवत १०० टक्के मतदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. जिल्हयातील ज्येष्ठ मतदार व दिव्यांग मतदारांचे टपाली मतदान करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे तिनही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपण मतदान करून इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

Share

-