संविधान पवित्र, त्याला रंगात अडकवू नका:मोदींनीही राष्ट्रपतींना लाल रंगाचे संविधान दिले होते; पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार

राहुल गांधी संविधनाच्या नावाने लाल पुस्तक का दाखताय? लाल पुस्तकच तुमच्या हातामध्ये का आहे? कुणाला तुम्ही लाल पुस्तकाच्या माध्यमातून इशारा देत आहात, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला आहे. संविधान हे पवित्र असून त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान देत असतानाचा फोटो जोडला आहे. काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? संविधान हे पवित्र असून तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. भारताच्या प्रत्येक नागरिकांकडे संविधान असले पाहिजे. या उद्देशाने राहुल गांधी संविधानची प्रभावीपणे जनजागृती करीत असल्याचेही ते म्हणाले. ह्याच पॉकेट संविधानाची एक प्रत स्वत: प्रधानमंत्री मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती. याबाबत फडणवीस यांचे काय मत आहे? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? कोल्हापूरमधील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘भारत जोडो’ अभियानावर टीका केली होती. या अभियानात अनेक डाव्या विचारांच्या संघटना सामील झाल्या आहेत, ज्यांच्या ध्येयधोरणांमुळे अराजकता पसरवण्याचा धोका आहे, असा दावा फडणवीस यांनी केला होता. संविधानाचा सन्मान सर्वांनी करावा, पण मग लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवालही फडणवीस यांनी राहुल गांधी यांना विचारला होता. यामार्गे अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली होती.

Share

-