ढोरकीन गावातील मारुती मंदिरात चोरी, गुन्हा दाखल:70 हजार रुपयांचे चांदीचे दागिने केले लंपास
पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महारुद्र मारुती मंदिरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी मूर्तीवरील ७० हजार रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सकाळी भाविक नित्याप्रमाणे मंदिरात पूजापाठ करण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मारुती मूर्तीवरील चांदीचे दागिने लांबविले. यात हातावरील कडे, पायावरील कडे, कमरेवरील पट्टा आदी ७० हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू व ॲम्प्लीफायर, इन्व्हर्टर बॅटरी घेऊन चोर फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे, बीट जमादार दिनेश दाभाडे व संदीप कोलते आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तपास करण्यासाठी श्वानपथक व ठसे पथकाला पाचारण केले होते. दरम्यान, दिवसभर पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेत तपासाची गती वाढवली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास पोलिस करत आहेत.