परप्रांतीय मोदी-शहांना राज ठाकरे मदत करताहेत:शिवतीर्थावर 17 नोंव्हेंबरला तणाव निर्माण होण्याची शक्यता; राऊतांनी व्यक्त केली शंका
राज्यात सध्या सर्वात मोठे परप्रांतीय हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आहेत. आधी त्यांना बाहेर काढा, अशा शब्दात उद्धव ठकारे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच महाराष्ट्रातून मुंबई काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी राज ठाकरे त्यांना मदत करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी म्हटले आहे. 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन हा 17 नोव्हेंबरला असतो. त्याच दिवशी दुसऱ्या पक्षाला ते मैदान देण्यात आले आहे. एक दिवस आधी अर्ज दिल्याने त्यांच्या पक्षाला ते मैदान देण्यात आले आहे. मात्र त्या दिवशी दिवसभर शिवसैनिकांचा तेथे राबता असतो. तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षाची सभा होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत व्यक्त केलेली चिंता ही गंभीर असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नेमके प्रकरण काय? विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कचे मैदान प्रचारसभेकरिता मिळण्यासाठी उद्धवसेना आणि मनसेने मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. त्याच दिवशी ठाकरे बंधू शिवाजी पार्कसाठी आग्रही असल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून नगरविकास विभागच यावर निर्णय घेईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मनपाकडे 15 ते 16 अर्ज वास्तविक या मैदानासाठी आतापर्यंत सुमारे 15 ते 16 अर्ज आले आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, मनसे या प्रमुख पक्षांचे वेगवेगळ्या तारखांचे अर्ज यात आहेत. 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे 17 तारखेसाठी सर्वच बाजूंनी मोठा दबाव आहे. उद्धव ठाकरेंनी दिला विनंतीवजा इशारा.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 17 नोहेंबरला स्मृतिदिन आहे. तो संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक तिथे येतील. त्याला आचारसंहिता लागू शकत नाही. तिथे तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. कुठेही संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर 17 तारखेला शिवाजी पार्क आम्हालाच मिळायला हवा, असा दावा ठाकरे यांनी केला आहे.