आघाडी सरकार माझे एन्काउंटर करणार होते:सदाभाऊ खोत यांचा दावा; 2012 च्या इंदापूर येथील शेतकरी आंदोलनाचा दिला दाखला

2012 मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने माझे एन्काउंटर करण्याचे षडयंत्र रचले होते, असा खळबळजनक आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मुलाखतीत केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे ऐन विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्याची शक्यता आहे. सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली असताना आता त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारने 2012 मध्ये आपले एन्काउंटर करण्याचा डाव रचला होता असा दावा केला आहे. काय म्हणाले सदाभाऊ खोत? सदाभाऊ खोत एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 2012 मध्ये इंदापूर येथे ऊसाचे आंदोलन सुरू होते. चंद्रकांत नलवडे नामक शेतमजुराचा मुलगा एका टेम्पोच्या आडोशाला उभे राहून आंदोलन पाहत होता. पोलिसांनी समोरून जाऊन त्याला गोळी घातली. त्यावेळी मला येरवड्याच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा बाहेर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व रस्ते पॅक झाले होते. तेव्हा पोलिसांनी मला आतमध्ये येऊन जामीन स्वीकारा व बाहेर येऊन सर्व शांत करा अशी विनंती केली. मी जामीन स्वीकारून बाहेर आलो. तुरुंगाबाहेर 3 ते 4 गाड्या उभ्या होत्या. मला पोलिस या गाडीत बसा, त्या गाडीत बसा असे सांगत होते. त्याचा मला संशय आला. पोलिसांनी एवढ्या चांगल्या गाड्या मला बसण्यासाठी का आणल्या? असा प्रश्न मला पडला होता. मी त्या डीवायएसपीचे नाव घेणार नाही. मला त्यांच्या नोकरीवर गडांतरही आणायचे नाही. पण त्याने मला चालत – चालत हळूच सांगितले की, भाऊ ज्या एक-दोन ठिकाणी आंदोलनाची दंगल सुरू आहे, त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन तिथे तुमचे एन्काउंटर करायचे आहे, असे सदाभाऊ खोत याविषयीची आठवण सांगताना म्हणाले. शरद पवारांवर केली होती अश्लाघ्य टीका उल्लेखनीय बाब म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी 3 दिवसांपूर्वी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर अश्लाघ्य शब्दांत टीका केली होती. शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणल्या, पण तरीही ते आपल्या भाषणात आपली महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची इच्छा असल्याचे सांगतात. अरे कसा चेहरा बदलता… महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार आहात का? असे ते म्हणाले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे व हे काँग्रेसवाले देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम घेरत आहेत. आपण शेतकरी माणसे आहोत. आपल्याकडे गाय आहे. राज्याची तिजोरी म्हणजे ही गायच आहे. देवेंद्र फडणवीस यांना या गायीचे सर्व दुध तिच्या वासरांना द्यायचे आहे. पण विरोधकांचा त्याला विरोध आहे. विशेषतः शरद पवारांना यामुळे आता आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांचे कसे होणार? ही चिंता लागली आहे, असेही सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले होते. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

Share

-