सुन लो ओवेसी, हे छत्रपती संभाजीनगर आहे:कुणीही शहराचे नाव बदलू शकत नाही, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. भाजप व महायुतीकडून अतुल सावे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारसभेत फडणवीस यांनी भाषण करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच यावेळी बटेंगे तो कटेंगेचा पुन्हा एकदा नारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्होट जिहाद करणार असतील तर मतांचे धर्मयुद्ध करावेच लागेल. ही निवडणूक आपली एकजूट दाखवण्यासाठी आहे. तसेच ओवैसी यांना देखील फडणवीस यांनी इशारा दिला आहे. सुन लो ओवैसी.. हे छत्रपती संभाजीनगर आहे. हे कालही भगवे होते, आजही आहे आणि उद्याही भगवेच असणार आहे. संभाजीनगरचे नाव बदलण्याची औकात कोणाची नाही, असे म्हणत फडणवीस यांनी ओवैसी यांना इशारा दिला आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मोठे प्रकल्प आम्ही आणले. देशातील सर्व प्रमुख कंपन्या इथे आणल्या. यापुढे 1 लाख कोटींची गुंतवणूक या संभाजीनगरमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. संभाजीनगरात नवीन क्रीडा विद्यापीठ तयार करण्याचा देखील मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. संभाजीनगरमध्ये 73 कोटींची गुंतवणूक आणली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना आम्ही आणली, महिलांना एसटी प्रवास मोफत केला. मुलींचे शिक्षण मोफत केले. अडीच कोटी बहीणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून विरोधक कोर्टात गेले. मुलींचे मामा मंत्रालयात बसले आहेत शिक्षणाची काळजी करू नका, असा विश्वास फडणवीस यांनी दिला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे आता 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Share

-