बँकांनी कर्ज वसुलीचे योग्य नियोजन करावे:जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांचे आवाहन, बँक प्रतिनिधींसाठी चर्चासत्र
बँका आर्थिक दृष्ट्या सुदृढ व सक्षम ठेवण्यासाठी कर्ज वसुलीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कर्ज खाते थकीत होणार नाही व कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज वसुली करून आपल्या बँकेचा फायदा करून द्यावा, असे आवाहन जिल्हा बँक असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी केले. अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनतर्फे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी कर्ज वसुली व्यवस्थापन या विषयावर हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या ज्ञानसत्रात जिल्ह्यातील २० बँकांचे एकूण ४५ प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे येथील कर्ज वसुली व्यवस्थापन तज्ञ राजेश यादव हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त माधव देशमुख व वसंत आव्हाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे माधव देशमुख यांनी बँकेच्या प्रगती करिता बँकेचे कर्जदार, अधिकारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये विश्वास व उत्तम समन्वय असणे खूप आवश्यक आहे, असे सांगितले. प्रशिक्षक राजेश यादव यांनी सोप्या भाषेत कर्ज खाते कसे थकणार नाही व कर्ज देताना घ्यावयाची काळजी, करावयाचे करार, तसेच कर्ज वसुलीचे विविध कायदे व उपलब्ध पर्याय याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. या ज्ञानसत्रामध्ये सर्व सहभागी बँक अधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानसत्राचे समन्वयक बारामती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी नवनाथ जगताप, असोसिएशनचे काकडे व पुनम बुरा यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार नवनाथ जगताप यांनी केले.