अमित ठाकरेंना राजकारण कळते का?:ते बालिश, काहीही बोलतात, शिवसेना ठाकरे गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार महेश सावंत यांची टीका

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र तथा माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांना राजकारण कळत नाही. ते बालिश असल्यासारखे काहीही बोलतात, अशी कडवट टीका येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी केली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपले विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यांना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत व मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. यामुळे येथील लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अमित ठाकरे यांची रविवारी सायंकाळी प्रभादेवी येथे सभा झाली. त्यात त्यांनी आपले चुलते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अगोदर सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आमच्या काकांना वाईट वाटले म्हणून त्यांनी माहीममध्ये आपला उमेदवार जाहीर केला. पण उमेदवार कितीही असले तरी मला फरक पडत नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अमित ठाकरेंना राजकारण कळते का? महेश सावंत म्हणाले, अमित ठाकरे यांना राजकारण कळते का? ते बालिश आहेत. काहीही बोलतात. ते काहीही बोलले तरी जनता आपला निर्णय घेण्यास सुज्ञ आहे. अमित ठाकरे आपल्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही असे ते म्हणाले. पण जनतेला कोण सहजपणे भेटू शकतो हे सर्वश्रूत आहे. आमची व त्यांची सभा बघा. त्याीवरून भाडोत्री माणसे कुठली हे लक्षात येईल. स्थानिक माणसे कुठली हे लोकांचे चेहरे पाहिल्यानंतर लगेचच लक्षात येईल. महेश सावंत यांनी यावेळी मी राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढा मोठा व्यक्ती नाही असेही स्पष्ट केले. अमित निवडणूक लढवेन याचा अंदाज नव्हता दुसरीकडे, राज ठाकरे यांनीही यावेळी महायुती व उद्धव ठाकरे यांना सर्वच अंडीपिल्ली बाहेर काढण्याचा इशारा दिला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला तेव्हा अमित विधानसभेला उभा राहील याचा मला अंदाज नव्हता. कदाचित त्यालाही ते माहिती नसेल. पण आता जे समोर येतील त्यांच्याशी आमचा सामना होईल, असे ते म्हणाले. मनसेचे नेते व सरचिटणीस यांची एक भेट झाली. त्यावेळी अमित ठाकरे यांनी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी निवडणूक लढवण्यावर जोर दिला. त्यांनी स्वतःही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मी बैठक घेतली. त्यात त्याला निवडणूक लढवणार का? असा थेट प्रश्न केला. त्यावर त्याने होकार दर्शवला. त्यानंतर आज अमित ठाकरे यांच्याविरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सर्व अंडीपिल्ली मी बाहेर काढू शकतो. पण मला त्या घाणीत हात घालायचा नाही. मतदारांच्या हाकेला 24 तास ओ देणारा माणूस हवा आहे. आमच्या उमेदवाराचे नाव अमित राज ठाकरे असे असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असेही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

Share

-