अमरावतीतील 947 मतदार इतर जिल्ह्यांत निवडणूक कामात व्यग्र:त्यांच्या मतदानासाठी प्रशासनाने पाठविल्या मतपत्रिका
अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाचे मतदार केवळ अमरावती जिल्ह्यातच राहतात, असे नाही. ९४७ मतदार इतरही जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने त्यांच्यापर्यंत टपाल मतपत्रिका (पोस्टल बॅलेट) पोचविल्या आहेत. निवडणूक कामात व्यग्र असल्यामुळे त्या ९४७ मतदारांना मतदानाच्या दिवशी अमरावतीला येता येणार नाही. त्यामुळे राज्यभरातील अशा मतदारांसाठीच्या मतपत्रिकांची देवाण-घेवाण संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी सदर मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्यात आली. अमरावीचे मूळ रहिवासी आहेत, परंतु नोकरीनिमित्त इतर जिल्ह्यात असल्याने त्यांना त्या-त्या जिल्ह्यात निवडणुकीच्या कामात गुंतविण्यात आले आहे. अशा मतदारांचा हक्क अबाधित राखण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील मतपत्रिका त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम आखला आहे. हा कार्यक्रम संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी खास दूत पाठविले होते. या दूतांमार्फत सदर मतपत्रिकांची देवाण-घेवाण करण्यात आली. निवडणूक यंत्रणेच्या आकडेवारीनुसार अमरावती जिल्ह्याचे सर्वाधिक ३८८ मतदार सध्या अकोला जिल्ह्यात निवडणुकीची ड्युटी बजावत आहेत. त्या खालोखाल ३४७ मतदार यवतमाळ जिल्ह्यात निवडणुकीच्या कामात व्यस्त असून वाशिम जिल्ह्यात १२३ तर बुलडाणा जिल्ह्यात ८९ मतदार आहेत. या सर्वांसाठीच्या मतपत्रिकांची देवाण-घेवाण पूर्ण झाली असून मतमोजणीच्या दिवसापूर्वी त्यांच्या मतपत्रिका येथे पोचतील, अशा बेताने मतदान करवून घेऊन परत पाठवाव्या, अशा सूचना निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ६८७ मतदार इतर जिल्ह्यांचे ज्या प्रमाणे अमरावती जिल्ह्याचे मतदार इतर जिल्ह्यात निवडणूक ड्युटी बजावत आहेत, त्याचप्रमाणे अमरावती विभागातील इतर चार जिल्ह्यांचे ६८७ मतदार अमरावती जिल्ह्यात निवडणूक ड्युटी बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या-त्या मतदारसंघाच्या मतपत्रिका मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्याचे २६५, यवतमाळ जिल्ह्याचे १७५, बुलडाणा जिल्ह्याचे १२९ आणि वाशिम जिल्ह्याचे ११८ मतदार आहेत.