100 कोटींच्या वसुली प्रकरणात पवार, ठाकरेंचा हस्तक्षेप:सर्वकाही त्यांच्या सूचनेनुसार होत होते, परमबीर सिंहांकडून चांदिवाल यांच्या दाव्याचे समर्थन
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या टार्गेटचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय उचलून धरला होता, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत आले होते. या प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणाले होते. तसेच या सगळ्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून हे सगळे होत असल्याचे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच सचिन वाझेने आपल्याला राजकीय नेत्यांचे नावे घेत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ठाण्याचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील लक्ष घालत असल्याचे सांगितले होते. याला माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दुजोरा दिला आहे. चांदिवाल योग्यच सांगत आहेत. लक्ष्मीकांत पाटील बदल्यांच्या प्रकरणात आणि वसूलीच्या प्रकरणात थेट सहभागी होते, असे परमबीर सिंग म्हणाले आहेत. पुढे बोलताना परमबीर सिंग म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून लक्ष्मीकांत पाटील या प्रकरणात हस्तक्षेप करत होते. साक्षीदारांवर लक्ष्मीकांत पाटील दबाव आणत होते. त्यांनी या प्रकरणात पूर्णपणे हस्तक्षेप केला होता. महाविकास आघाडी सरकार असताना अनिल देशमुख हे सातत्याने पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये ढवळाढवळ करत होते, असा आरोपही परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग म्हणाले, मी चांदिवाल आयोगासमोर माझ्याकडे असणारे पुरावे मेसेजेस आणि इतर अधिकाऱ्यांनी मला जे सांगितले खंडणीची मागणी कशी मागितली होती हे सर्व मी सांगितले होते. मी त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल देशमुख यांचा पोलिसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप असल्याचे देखील सांगितले होते. याचे सर्व पुरावे मी सीबीआय आणि ईडीला दिले असल्याचे परमबीर सिंग म्हणाले आहेत. आशिष शेलार यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, माजी न्यायमूर्ती चांदिवाल यांनी केलेला खुलासा आणि आलेल्या बातम्या पूर्ण स्पष्ट करत आहे की महाविकास आघाडी ही भ्रष्टाचारात संपूर्णतः बुडालेलली होती. वसूली गॅंग सचिन वाझे यांचे स्टेटमेंट, चांदिवाल साहेबांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर जे समोर येत आहे की सरकारने त्याकाळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आयोगाला कुठली मदत केली नाही, व्यवस्था उभ्या करून दिल्या नाहीत, या सगळ्यातून आवश्यक कागदपत्रे पुरावे समोर आणलेच नाहीत आणि कुठली क्लीन चीट या चांदिवाल आयोगाने अनिल देशमुख यांना दिलीच नाही. मग कल्पोकल्पीत क्लीन चीट आली कुठून? उद्धवजी या चांदिवाल आयोगाला मदत का नाही केलीत? पवार साहेब अनिल देशमुख यांना क्लीन चीट दिल्याचे नाटक हे का केले गेले? चांदिवाल आयोगाचा रीपोर्ट का दाबून ठेवला? यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना गुंतवण्याचा कट का रचला गेला? सचिन वाझे यांचे स्टेटमेंट की माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, हे सगळे गौडबंगाल समोर आलेले असताना उद्धवजी, शरद पवार साहेब आणि महाविकास आघाडी यांच्यातली आपरदर्शकता काय सांगते? म्हणून आता या सगळ्याची सीबीआय चौकशी होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी घोटाळा हा झाला असून त्यात आपल्या तपास यंत्रणांना घेऊन झाला आहे, तो तत्कालीन गृहमंत्र्यांनी केला आहे, त्यावर पडदा टाकण्याचे काम करण्यात आले आहे, या सगळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.