सोलापूर येथील भर सभेतच ओवैसींना पोलिसांची नोटीस:फोटो काढला आणि मराठी असल्याने इंग्रजीत मागवली प्रत
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सोलापूर येथे सभा पार पडली. या सभेत स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिल्याचे समोर आले आहे. प्रक्षोभक भाषण करू नका, अशा आशयाची नोटीस असल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फरूख शाब्दी यांच्या प्रचार सभेत इतरांचे भाषण सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी असदुद्दीन ओवैसी यांना नोटीस दिली. ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही अशी प्रक्षोभक भाषा वापरू करू नये अशी पोलिसांनी नोटीस दिली. भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती आहे. मात्र ती नोटीस मराठी भाषेत असल्याने ओवैसी यांनी इंग्रजी भाषेत नोटीस मागवली. यावेळी त्यांनी मराठी नोटीसचा फोटो देखील काढून घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठण यांनी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. शौकत पठाण हे स्वतः सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र काँग्रेसने शौकत पठाण यांना उमेदवारी नाकारल्याने ते काही दिवसापासून नाराज होते. आज ओवैसी यांच्या सभेत थेट मंचावर येऊन शौकत पठण यांनी एमआयएम उमेदवार फारुख शाब्दी यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत बोलताना ओवैसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादमुळे भाजपचा अनेक जागांवर पराभव झाला. पण मग अयोध्येतही तुमचा पराभव कसा झाला? तिकडे तुम्हाला मतं का मिळाली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस सातत्याने ‘व्होट जिहाद’, ‘धर्मयुद्ध’, असे शब्द बोलत असतात. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का? फडणवीस तुम्ही काही आमदार विकत घेतले, मग तुम्हाला चोर किंवा दरोडेखोर म्हणावे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.