बीडमध्ये वंचितकडून अपक्ष उमेदवाराला काळे फासत मारहाण:भाजपला पाठिंबा दिल्याने कार्यकर्ते आक्रमक, चाबकाने दिले फटके

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष उमेदवाराला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचितला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळे फासत मारहाण करण्यात आली आहे. सचिन चव्हाण यांना काळे फासत शैलेश कांबळे म्हणाले, सचिन चव्हाण यांनी जो काही प्रकार केला आहे याचा आम्ही निषेध करतो. बाळासाहेब आंबेडकरांना धोका या सचिन चव्हाण याने दिला आहे, असे म्हणत शैलेश कांबळे यांनी चाबकाने मारहाण केली आहे. अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून शैलेश कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच बाळासाहेब आंबेडकरांना धोका दिला म्हणत त्यांनी सचिन चव्हाण यांना चाबकाने फटके मारले असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सर्वच भागांमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच इतर पक्षांकडून व अपक्ष उमेदवारांकडून देखील पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तसेच निवडणुकीच्या रिंगणात आता तिसरी आघाडीने देखील उडी घेतली आहे. आमदार बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे व राजू शेट्टी यांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share

-