महाराष्ट्रात सर्वधर्मसमभाव विचार महत्वाचा:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन; बटेंगे तो कटेंगेला थारा नसल्याचा दावा

आम्ही सर्वधर्म समभावाचे आहोत. आम्ही सर्व जातीधर्मांचा सन्मान करताे. काेणी वेगळे मत व्यक्त केले तर माझे स्पष्ट मत आहे की, आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. त्यामुळे एकमेकांविषयी वाईट बोलण्याने काहीही साध्य होणार नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपला बटेंगे तो कटेंगेला विरोध असल्याचेही स्पष्ट केले. जगातील जे देश गुण्यागाेविंदाने एकत्रित राहतात तेच पुढे जातात. महायुतीचे सरकार आणण्यासाठी जनतेचे पाठबळ महत्वाचे आहे. काेणत्याही समाजाला धक्का लागेल, किंवा तो बाजूला पडेल असे अल्पसंख्याक समाजाबाबत काही हाेणार नाही. प्रगती, पुराेगामी, सर्वधर्म समभाव विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करतात. काही लाेक बाहेरुन शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात येतात आणि ‘बटेंगे ताे कटेंगे’ अशी वेगळी विधाने करतात. अशी विधाने उत्तर भारतात चालत असतील, महाराष्ट्रात चालत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे आयाेजित जाहीर सभेत ते बाेलत हाेते. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे विविध पदाधिकारी उपस्थित हाेते. पवार म्हणाले, विराेधकांनी किती आराेप केले की, आम्ही कंगाल केले राज्याला, आर्थिक स्थिती बिघडवली, कर्जबाजारी केले. पण आम्हाला काही कळत नाही का? मी दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे. तज्ञांच्या मदतीने आम्ही नियाेजन करुन लाडकी बहीण याेजना तसेच विविध याेजनेसाठी साडेसात हजार काेटी रुपये बाजूला काढले. विराेधक आमचा हिशाेब चुकल्याचे सांगतात. पण आता त्यांनी त्यांचा हिशाेब बराेबर आहे का? हे स्पष्ट करावे. लाडकी बहीण योजनेमुळे आमच्या बहिणी खूश झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. विराेधकांना दीड हजार रुपयांची किंमत माहिती नाही. कारण त्यांनी सत्तेत असताना दीड रुपये कधी जनतेस दिले नाही. सर्व समाजाच्या महिलांना आम्ही मदत केली असून काेणता भेदभाव केलेला नाही. गरीब मुलींच्या महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी सहा हजार काेटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. महिलांना तीन सिलेंडर माेफत देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. महायुतीचे सरकार हे जनतेचे आहे. नागरिकांना आप्तकालीन काळात देखील मदत दिली. आम्ही रडत बसणारे नसून काम करणारी माणसे आहोत. जुन्नर मध्ये नवीन बिबट केंद्र १५० क्षमतेचे बांधण्यात येणार आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Share

-