पुण्यात गेलेल्या तरुणाचा मारहाण करून खून:तरुण मुलाच्या हत्येमुळे आईचा आधार हरवला

पुण्यात चुलत भावाकडे गेलेल्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील तरुण बालाजी लांडे याला संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डांबून ठेवून, शरीरावर काळेनिळे व्रण उमटेपर्यंत जबर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बालाजीने शुक्रवार, १७ जानेवारी रोजी आपल्या वृद्ध आईला फोन करून सांगितले की, तो रांजणगाव येथे असून पुण्यात मामा-मामीकडे चालला आहे. तिथे गेल्यावर फोन करतो, असे बालाजीने आईला शेवटचे सांगितले होते. तरुणाच्या खुनामुळे वृद्ध आईचा आधार हरवला असून गावावर शोककळा पसरली आहे. दिंद्रुड येथील बालाजी ऊर्फ (बालासाहेब) मंचक लांडे (२२) हा तरुण शुक्रवार, १७ जानेवारी रोजी पहाटे त्याचा सख्खा चुलतभाऊ ओमकार विलास लांडे (रा. रांजणगाव) याच्याकडे गेला होता. तिथून तो त्याच्या मित्राकडे आळंदी येथे महिंद्रा कंपनीत मुलाखतीसाठी जाणार होता, असे त्याच्या भावाने सांगितले. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर त्याचा मोबाइल बंद होऊन तो बेपत्ता झाला. चुलतभाऊ परशुराम लांडे पुण्यात त्याचा शोध घेत होता, तर दुसरा भाऊ ओमकार लांडे फोनवर शोध घेत होता. याप्रकरणी पुणे सिटी क्राइम ब्रँच पोर्टलवर ऑनलाइन मिसिंगची तक्रार दाखल केली होती. काही वेळाने परशुराम यास पिंपरी चिंचवड क्राइम ब्रँचने फोन करून त्याला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल येथे बोलावून घेत मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये बालाजी यास दाखल करून दोघांनी पळ काढला. बालाजीच्या वडिलांनी पंधरा वर्षांपूर्वी आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची वृद्ध आई असे दोघेच राहत होते. वृद्धापकाळात आईची काठी होण्याअगोदरच बालाजीची हत्या झाल्याने वृद्धावस्थेत आईचा आधार गेला. पुण्यातील संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खुनाच्या घटनेत बालाजीच्या शरीरावर, डोक्यात मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्या असून संत तुकारामनगर पोलिस ठाणे आणि सिटी क्राइम ब्रँचने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून बालासाहेब लांडे यास रुग्णालयात दाखल करणाऱ्या ऑटोचालकासह एकास सोमवारी ताब्यात घेतले आहे. बालाजीच्या मृतदेहावर दिंद्रुड येथील जुने बसस्थानक परिसरात मंगळवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्ध आईची काठी हरवली

Share