अब्दुल सत्तारांच्या ओएसडींवर अमोल मिटकरींचे गंभीर आरोप:तानाजी सावंत यांच्यासह आणखी तीन मंत्र्यांची घेतली नावे, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ओएसडी आणि स्वीय सहायक यांच्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक म्हणून स्थान नसणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. या निर्णयाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कौतुक केले आहे. तसेच अमोल मिटकरी यांनी माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी आणखी तीन मंत्र्यांची नावे घेतली आहेत. अमोल मिटकरी यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आणखी तीन मंत्र्यांची नावे अमोल मिटकरी यांनी घेतली आहेत. या मंत्र्यांच्या ओएसडींकडून देखील आपणास त्रास झाल्याचे मिटकरी म्हणाले आहेत. तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांचे नाव घेत गंभीर आरोपही केले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी यांनी माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप केले होते. 5 कोटींच्या एका कामासाठी भुमरे यांच्या खात्यातील एका ओएसडीने 5 लाखांची मागणी केल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला होता. तसेच पुढे अमोल मिटकरी यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाटबंधारे मंत्री संजय राठोड आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ओएसडींसंदर्भात असेच अनुभव आल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळेच अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत आज मंत्रिमंडळात नाहीत, असेही अमोल मिटकरी म्हणाले. तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांच्यावर अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांमध्ये मोगल यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला. तसेच मोगल यांनी विदर्भाच्या विद्यापीठावर विदर्भा बाहेरचे प्रतिनिधी नेमल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, आपल्या मतदारसंघात हजारो कोटींचे विकास कामे केल्याचा दावा करणाऱ्या आमदारांना हा निधी कसा मिळतो, हेही विचारा, असा टोला लगावला आहे. राष्ट्रवादीत इनकमिंग होणार – अमोल मिटकरी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटात लवकरच मोठ्या नेत्यांचे इनकमिंग होणार असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीमधील पक्षातील अनेक आमदार व खासदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्राला लवकरच ही नावे कळणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार, खासदार अजित दादांना भेटून गेले आहेत. माजी आमदार विजय भांबळे, राहुल मोटे आणि राहुल जगताप यांच्या संदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. या संदर्भात महायुतीतील इतर मित्र पक्षांचीही मत लक्षात घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.

Share