अबू आझमींना सत्र न्यायालयाचा दिलासा:20000 रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण, मोगल बादशहाचे गायले होते गुणगान

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यामुळे अडचणीत आले होते. मोगल बादशहा औरंगजेबाचे गुणगान गायल्यामुळे त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र आता या गुन्ह्यात अबू आझमींना सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या बाँडवर त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच 12, 13 आणि 15 रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत दाखल झालेल्या वादग्रस्त विधानावर आधारित गुन्ह्यात अबू आझमींनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, ज्याला कोर्टाने मंजुरी दिली आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबितही करण्यात आले. निलंबन झाल्यानंतर अबू आझमींनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत औरंगजेबाबाबत केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देखील दिले. मात्र, या विधानामुळे त्यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही होणार होती. परंतु, त्यांना आता सत्र न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. नेमके काय म्हणाले होते अबू आझमी? औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती, असे अबू आझमींनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अबू आझमींनी माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांकडून अधिवेशनात गोंधळ देखील घालण्यात आला. यामुळे विधीमंडळाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित आमदार असणार आहेत. अबू आझमींनी काय दिले होते स्पष्टीकरण? टीकेची झोड उठल्यानंतर आणि विधिमंडळातून निलंबन झाल्यानंतर अबू आझमी यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले होते. मी कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. आम्ही जे काही भाषणे ऐकतो, त्यावरुन मी वक्तव्य केले. यावर वाद तयार करण्याची काय गरज आहे? असा सवाल त्यांनी केला होता. भाजपला ज्या मुद्द्यांवरून मते मिळतात त्याच मुद्द्यांवर वाद निर्माण केले जातात, असेही ते म्हणाले. महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा द्या, तसा कायदा करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे या आधीच केली आहे. ज्याची सत्ता असते तो कसाही गुन्हा दाखल करु शकतो. आज त्यांची सत्ता आहे, त्यांनी खुशाल आपल्याला तुरुंगात घालावे. जे इतिहासात सत्य आहे ते बदलता येणार नाही, असे स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिले होते.

Share