राज ठाकरेंबद्दल अपशब्द पडले महागात:मनसे कार्यकर्त्यांकडून तरुणाला चोप, वाहतूक पोलिसाने तातडीने घेतली धाव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या एकमेव आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. दरम्यान, यानंतर राजू पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यालयाच्या बाहेरच मनसे पदाधिकाऱ्यांनी एका परप्रांतीय तरुणाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांच्याविषयी या तरुणाने अपशब्द वापरले या कारणावरून मनसेने त्याला चोप दिला आहे. कल्याण रोडवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या तरुणाला ताब्यात घेतले व जमावाच्या गर्दीतून बाहेर काढले. तसेच काही महिला कार्यकर्त्या देखील तिथे उपस्थित होत्या, त्यांनी या तरुणाला चौकीत नेण्याची मागणी केली. यावेळी मानपाडा पोलिसांना बोलावून घेत या तरुणाला वाहतूक पोलिसांच्या केबिनमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे समजल्यावर हा तरुण घाबरलेला दिसला. यावेळी वाहतूक पोलिसाने त्याला मिठीत घेत गर्दीतून वाट काढत बाहेर नेत वाहतूक पोलिसांच्या केबिनमध्ये बसवले. मनसेच्या एका महिला कार्यकर्तीने या तरुणाने राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला आहे. कल्याण रोडवर वाहतूक कोंडी झाली असताना या तरुणाने राज ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत वाईट शब्द वापरत यांच्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असे या तरुणाने म्हणल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी तात्काळ इतर पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत या तरुणाला चोप दिला आहे.

Share