निवडणूक प्रशिक्षणावरून परतताना शिक्षकाचा अपघाती मृत्यू:कन्नड तालुक्यातील टापरगाव जवळ झाला अपघात
निवडणुकीचे प्रशिक्षण आटोपून गावी परत जात असताना प्रा. प्रवीण भोकरे यांचे मांगळवार दि. १२ रोजी अपघाती निधन झाले. कन्नड तालुक्यातील नागद येथील राष्ट्रीय विद्यालयातील प्रा. प्रवीण भोकरे यांचे संभाजीनगर येथील युनिव्हर्सल हायस्कूल एमआयडीसी,चिकलठाणा येथे दुसरे प्रशिक्षण होते. फुलंब्री विधानसभा मतदार संघात केंद्राध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून व आपले पेपर बॅलेट मतदान करून ते आपल्या गावी घरी परत येत असताना टापरगाव पुलाजवळ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय (घाटी) येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मयत प्रा.भोकरे हे ४० टक्के अंशतः अनुदानितवर कार्यरत होते.त्यांच्या पार्थिवावर मुळगाव गोंदेगाव ता.सोयगाव येथे बुधवार दि.१३ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील सुधाकर शंकर भोकरे,आई पुष्पा सुधाकर भोकरे,पत्नी अश्विनी सुधाकर भोकरे,भाऊ निलेश सुधाकर भोकरे, दोन बहिणी असा परिवार आहे.