पिस्टल विक्रीसाठी आलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या:वसमत स्थानिक गुन्हे शाखेची कामागिरी

वसमत येथील रेल्वेस्थानक परिसरात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ता. १३ रात्री बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात फरार झालेल्या एकाचा शोध सुरु असून त्याच्या कडून पिस्टल विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्हयात विशेषतः नांदेड व परभणी जिल्हयापासून लगत असलेल्या वसमत परिसरात शस्त्र विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी गुन्हे शाखेचे दोन पथके स्थापन केली आहेत. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार आझम प्यारेवाले, आकाश टापरे, हरिभाऊ गुंजकर, नितीन गोरे, साईनाथ कंठे यांच्या पथकाने दोन दिवसांपुर्वीच आसेगाव पाटी जवळ एका तरुणाकडून ४० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल जप्त केले होते. या प्रकरणी सुरज पाटील (रा. नांदेड) व पवन पुयड याच्या विरुध्द वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, त्यानंतर रविवारी ता. १३ पोलिस यंत्रणा दुर्गामुर्ती विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात असल्याचा गैरफायदा घेत विशाल भोळे, आलम उर्फ असलम शेख (रा. पालम, जि. परभणी) हे दोघे वसमत रेल्वेस्थानक परिसरात पिस्टल विक्रीसाठी आले होते. याबाबतची माहिती मिळताच उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादर निरंजन नलवार, कुमार मगरे, विकी कुंदनानी यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी विशाल भोळे यास अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्टल जप्त केले आहे. पोलिसांनी आलम उर्फ असलम शेख याचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, तीन दिवसांच्या अंतरात दोन पिस्टल पकडल्यामुळे पोलिसांचे लक्ष आता वसमत तालुक्याकडे लागले असून या ठिकाणी यापुर्वी काही पिस्टल किंवा इतर शस्त्र विक्री झाले का याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून पिस्टल विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Share

-