संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी-पोलिसांची मिलीभगत:अंबादास दानवेंचा आरोप, PI सह वाल्मिक कराडला आरोपी करण्याची मागणी
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे धनंजय मुंडे यांच्या जवळील वाल्मिक कराड याच्यासह पोलिसांचाही हात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. पीआय आणि वाल्मिक कराड यांसारख्या लोकांना आरोपी न केल्यास अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज मस्साजोग गावात भेट दिली. यावेळी त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तत्पूर्वी त्यांनी बीडचे पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेतली. कोणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता खून प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करा, अशा सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या. …तर देशमुखांचा जीव वाचला असता
प्रशासन कोणाच्या तरी हाताचे बाहुले बनलेले आहे. पोलिसांनी ठरवले असते, तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, असे अंबादास दानवे म्हणाले. परंतु, कानावर आलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पोलिस एकमेकांना मिळालेले आहेत, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. इथे काही लोकांची दादागिरी एवढी सुरू आहे की, पोलिस देखील काही करू शकत नाही, अशी स्थिती असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. पोलिसांनी तत्काळ पावले उचलली नाहीत
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळील वाल्मिक कराड यांसारखी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही. कुणीही येतो, दादागिरी, हम करे सो कायदा, असे सुरू आहे. यातूनच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आल्याचे अंबादास दानवे म्हणाले. संतोष देशमुखांचे अपहरण झाल्यानंतर नातेवाईक पोलिसांकडे गेले असता त्यांनी तक्रार घेतली नाही. तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला साडेतीन तास पोलिस ठाण्यात बसवले. संतोष 15 – 20 मिनिटांत येतील, असे पोलिस सांगत होते. अखेर संतोष देशमुख यांच्या खूनाची बातमी आल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद करून घेतला, असेही दानवे यांनी सांगितले. संतोष देशमुखांच्या हत्येमागे पोलिसांचाही हात
संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतरही पोलिसांचा तपास गतीने सुरू नाही. मुख्य आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलिस अधिकारी देखील या प्रकरणात दोषी आहे. संतोष देशमुख कुठे आहेत, कसे आहेत याची माहिती पोलिसांना होती, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणात येथील पीआयला आणि वाल्मिक कराड यांसारख्या लोकांना आरोपी केले पाहिजे. पोलिसांनी तसे न केल्यास अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरू, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. …तर जनतेला उठाव करावा लागेल
मी बीडला बदनाम करणार नाही. परंतु, काही व्यक्तींमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बीडचे नाव बदनाम होत आहे. निवडणुकीत सुद्धा ते दिसून आले. उमेदवारांना देखील मतदान केंद्रात जाऊ देत नव्हते. पोलिस तोंड घेऊन बघत होते. दादागिरी आणि दहशत पोलिसांनी नाही मोडली, तर जनतेलाच उठाव करावा लागेल, असेही अंबादास दानवे म्हणाले.