अचलपूर बाजार समितीत धान्याची आवक वाढली:तत्काळ मालाची मोजणी करत चुकारा करण्याचे निर्देश

अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने शेतमाल ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. त्यातच मक्याची आवक सर्वाधिक आहे. बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी कर्मचाऱ्यांना योग्य ते नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या असून, तत्काळ मालाची मोजणी करत चुकारा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑक्टोबर महिन्यात मका ३७ हजार ४५ क्विंटल, सोयाबीन ३३ हजार ७७६ क्विंटल, गहू कट्टे ३६६२, हरभरा १०७१, तूर कट्टे १४७३, ज्वारी कट्टे २१८६ अशी आवक राहिली, तर गुरुवार, ७ नोव्हेंबरला १८ हजार ०२४ क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. मेळघाट, मध्य प्रदेश, चिखलदरा येथील शेतकरी अचलपूर बाजार समितीत धान्य विक्रीसाठी प्राधान्य देतात. या बाजार समितीत शेतीमालाला योग्य भाव व नगदी चुकारा हा महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे बाजार समितीत मक्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मक्याला प्रती क्विंटल १८०० ते २३५० रुपये या भावाने खरेदी केले जात आहे. बाजार समितीत दररोज मक्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असून, शेड पूर्ण भरले आहे. बाजार समिती व अडते, व्यापारी शेतकऱ्यांच्या धान्य मालाला सुरक्षित जागी ठेवून तत्काळ लिलावाची प्रणाली गतिमान करत माल उचलण्याच्या प्रक्रियेलाही गती देत आहे. बाजार समितीत धान्य आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य त्या सुविधा देण्याचे काम बाजार समितीच्या वतीने केले जात आहे. सभापती राजेंद्र गोरले यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना योग्य ते नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Share

-