आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, सीएमपदावरून वाद नाही- अमित देशमुख:सांगलीत बंडखोरी झाली असली तरी हा बालेकिल्लाच
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १४ जागा जिंकत महाविकास आघाडीत मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, असे काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी सोमवारी सांगलीत सांगितले. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला उत्तम प्रतिसाद आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षाचा हिशेब केला तर काँग्रेस सर्वाधिक जागा निश्चितपणे जिंकेल आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद निश्चित प्राप्त केले जाईल. या मुद्द्यावरून महाविकास आघाडी दुभंगणार नाही, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त करून सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असली तरी काँग्रेसचा हा बालेकिल्ला अभेद्य राहील असेही सांगितले. दरम्यान, सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांच्याप्रमाणे राज्यातील सहा मतदारसंघात काँग्रेस पटर्न राबवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. काही जागा सोडल्या तर असे चित्र सध्या तरी दिसत नाही. एकूणच राज्यात काँग्रेस हा आता मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसतो की नाही हे २३ नोव्हेंबरनंतरच कळणार आहे. यानंतर आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट यांची काय भूमिका असेल याकडेही लक्ष आहे. बंडखोर जयश्री पाटील यांच्यावर कारवाई नाहीच सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने इच्छुक असलेल्या वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली असली तरीही प्रदेश काँग्रेसने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई अद्याप केलेली नाही. त्यामुळे या बंडखोरीला पक्षश्रेष्ठींचे बळ आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या राज्यातील २८ जागांवर काँग्रेस पक्षाने रविवारी कारवाई केली, परंतु त्यात जयश्री पाटील यांचे नाव नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. ही कारवाई सहा वर्षांसाठी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. याबरोबरच बंडखोर जयश्री पाटील यांचे कट्टर समर्थन करणारे काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्याबाबत काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले. मनोज जरांगे पाटील यांची भाजपनेच फसवणूक केली मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची महायुतीने आणि विशेषत: भाजपने फसवणूक केली आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत निश्चित दिसेल, असा दावा करून जरांगे यांनी या निवडणुकीत सहभाग न घेण्याचा निर्णय हा कौतुकास्पद आहे. मराठा समाजाची महायुतीकडून झालेली अवहेलना हा समाज मतदानाद्वारे व्यक्त करेल आणि त्याचा महाविकास आघाडीला निश्चितपणे फायदा होईल, असा दावाही देशमुख यांनी केला.