पारंपरिक वाणांच्या संवर्धनासाठी कृषी विद्यापीठात “जिनोम क्लब”‎:शेकडो दुर्मिळ वाणांच्या शोध व संवर्धनासाठी प्रयत्न

जागतिक अन्न संघटनेच्या‎अभ्यासानुसार, जगभरातील विविध‎पिकांमधली जैवविविधता सुमारे ७५‎टक्क्यांनी संपुष्टात आली आहे. तसेच‎आज देशात ‘अन्नसुरक्षा” हे उद्दिष्ट‎साध्य झालेले दिसत असले, तरी‎‘पोषणसुरक्षा” हे नवीन आव्हान उभे‎राहिले आहे. दोन्हीवर उपाय म्हणजे‎पारंपरिक वाणांचा प्रसार असे तज्ञ‎सांगतात. याच उद्देशातून अकोला येथील‎कृषी विद्यापीठात “जीनोम क्लब”‎कार्यरत झाला आहे. डॉ. पंजाबराव‎देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी‎वनस्पतीशास्त्र विभागाला हा प्रकल्प‎प्रदान करण्यात आला आहे. या‎प्रकल्पांतर्गत मॉडेल “जीनोम क्लब”‎स्थापन करण्यात आला आहे. क्लबद्वारे‎राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत‎पारंपरिक बियाणे जतन करण्याच्या दिशेने‎कार्य वेगाने सुरू आहे. आतापर्यंत‎विदर्भातील अनेक जिल्ह्यात फिरून मूग,‎उडीद, टोमॅटो, वांगी, मका अशा शेकडो‎पारंपरिक वाणांचे संवर्धन करण्यात आले‎आहे. क्लबच्या माध्यमातून शेतकरी,‎शास्त्रज्ञ, शाळकरी मुले इत्यादींमध्ये‎प्रशिक्षणाद्वारे जैवविविधता आणि‎बौद्धिक संपदा हक्कांच्या संवर्धनाबाबत‎जनजागृती करण्याचे काम होत आहे.‎ प्रसार आणि उत्पादन व्याप्तीवर काम‎
मॉडेल जीनोम क्लबच्या माध्यमातून प्रकल्पांतर्गत‎विविध दृष्टिकोनातून महत्त्वाच्या वनस्पतींच्या जाती‎ओळखल्या जात आहेत. त्यांचा प्रसार आणि उत्पादन‎व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे.‎प्रकल्पाचे मुख्य संशोधक आणि कृषी वनस्पतीशास्त्र‎विभागाचे माजी प्रमुख डॉ. आर. बी. घोराडे यांच्याद्वारे‎या कामाला सुरुवात झाली. कृषी वनस्पती शास्त्र‎विभागाचे प्रमुख डॉ. टी. एच. राठोड यांच्या मार्गदर्शनात‎सहयोगी प्रा. प्रिती सोनकांबळे, नैना पळसपगार, सचिन‎शिंदे, डॉ. मनीष वाकोडे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक‎जयश्री वसुले तसेच प्रकल्प सहयोगी शिवानी होटे व‎मोहन सुरुशे, तांत्रिक मदतनीस नेहा माने व शुभांगी‎दामोदर प्रकल्पांतर्गत काम करत आहेत.‎ जुन्या वाणांचे मूल्यमापन,‎दस्तऐवजीकरण करणार‎
विदर्भात अनेक शेतकरी आहेत, जे‎जैवविविधता आणि पारंपारिक जाती‎वाचवण्यासाठी काम करतात.‎विविध पिकांच्या जुन्या व पारंपारिक‎बियाण्यांचे संवर्धन करणाऱ्या‎शेतकरी व शेतकरी गटांचा या‎क्लबतर्फे गौरव करण्यात येत आहे.‎यासोबतच उपलब्ध वनस्पती‎जैवविविधतेचे व विविध पिकांच्या‎पारंपरिक व जुन्या वाणांचे योग्य‎मूल्यमापन व दस्तऐवजीकरण‎करण्यात येत आहे.‎

Share

-