अजित पवारांना बारामती कोर्टाकडून समन्स:2014 च्या निवडणुकीतले वादग्रस्त विधान भोवले, न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती कोर्टाकडून समन्स बजावण्यात आला आहे. अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करू, असे विधान 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केले होते. या प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे हे 2014 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार होते. त्यावेळी देखील खोपडे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता बारामती कोर्टाने अजित पवारांना समन्स बजावले असून कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काय आहे नेमके प्रकरण?
अजित पवार यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार करताना मतदारसंघातील गावकऱ्यांना दमदाटी केली असल्याची माहिती आहे. बारामती येथील मासाळवाडी या गावात 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौरा सुरू होता. या गावात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न त्यावेळी होता. तेव्हा प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावाचे पाणी बंद करू. तुमचा दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न सोडवतो, आम्हालाच मतदान करा, अशी दमदाटी केली असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याच संदर्भात सुरेश खोपडे यांनी याचिका दाखल केली होती. सुरेश खोपडे यांनी अजित पवारांच्या या विधानाच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर आता बारामती कोर्टाने अजित पवारांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यावर अजित पवार कोर्टाने दिलेल्या नियोजित तारखेला हजर राहणार की नाही याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याससाठी अजित पवारांनी हे विधान केले होते, मात्र यंदाच्या निवडणुकीत मात्र दोघेही एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळाले आहे.