खोतांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा संताप:’विनाश काले विपरीत बुद्धी’; भाजप नेत्यांना उघडपणे इशारा देण्याची पहिलीच वेळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील अंतर खूपच वाढले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही करत आहेत. मात्र सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ म्हणत अजित पवारांनी खोतांना सुनावले आहे. इतकेच नाही तर आपण त्यांना फोन करुन असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे देखील सांगितले असल्याचे अजित पवारांनी सांगितले. सदाभाऊ खोत हे जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघात सभा घेत होते. इतर नेत्यांप्रमाणे तेही विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत होते. मात्र त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. पण नंतर त्याची जीभ घसरली. शरद पवार यांच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्राचा चेहरा करायचा का? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अजित पवारांनी व्यक्त केला संताप सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी खोतांना फोन करुन नाराजीही व्यक्त केली. त्यांनी तत्काळ सदाभाऊंशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यावरील कोणतीही वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. अजित पवार म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. शरद पवारांवर कोणी अशी टिप्पणी केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. कोणीही वैयक्तिक टिप्पणी करू नये. आपण महायुतीचा भाग असलो तरी पवार साहेबांवर एवढ्या खालच्या पातळीवर टीका करणे आपल्याला वैयक्तिकरित्या अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांना उघडपणे इशारा या संदर्भात अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यावर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक टीका खपवून घेणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. शरद पवार यांच्याबाबत अजित पवारांनी भाजप नेत्यांना उघडपणे इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Share