अकोल्यातून नरेंद्र मोदींची मतदारांना साद:राम मंदिर, वाढवण बंदरचा उल्लेख; पुन्हा महायुतीला आशीर्वाद देण्याचे आवाहन
9 नोव्हेंबर ही तारीख ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला होता. त्यानंतर देशभरात उत्साह साजरा झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विकासाचा लेखाजोखा मांडला. महाराष्ट्रत वाढवण बंदर तयार झाल्यानंतर हे देशातील सर्वात मोठे बंदर असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यासाठी 80 हजार कोटी रुपये दिले असल्याचे ते म्हणाले. आमचे सरकार येऊन काहीच महिने झाले आहेत. मात्र देशभरात कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक प्रकल्प सुरू झाले असल्याचे ते म्हणाले. 2014 ते 2024 या काळात महाराष्ट्रतील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला असल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक वर्षांपासून तुमची मागणी प्रलंबित ठेवली होती. मात्र ती मागणी आता आमच्या सरकारने पूर्ण केली असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने केले असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी आघाडी सरकारने पूर्ण होऊ दिली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.