निवडणूक प्रचारासाठी आवश्यक सर्व परवानग्या एक खिडकी कक्षातूनच:चांदवडला निवडणूक प्रक्रियेविषयी राजकीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन‎

चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षेतखाली शुक्रवारी (दि. १८) मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी, निवडणूक नायब तहसिलदार डॉ. मिनाक्षी गोसावी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ उपस्थित होते. दि. २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार आहेत. नामनिर्देशपत्रांची पूर्व तपासणी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक असलेले सूचक, शपथपत्र, ना देय प्रमाणपत्र, एबी फॉर्म, अनामत रक्कम, बँकखाते, उमेदवाराचे स्वतःचे छायाचित्र, गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती यासह इतर बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आली. सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना सूचना देण्यात आल्या. उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी एकाच ठिकाणी म्हणजे एक खिडकी कक्षामधून दिल्या जातील असे सांगण्यात आले. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहे. नामनिर्देशनपत्र सादर करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापासून १०० मिटर अंतरापुढे तीनपेक्षा अधिक वाहने आणता येणार नाहीत तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात केवळ पाच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. ३०६ मतदान केंद्र चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात एकूण ३०६ मतदान केंद्र आहेत. त्यात महिला कर्मचार्‍यांनी चालविलेले मतदान केंद्र ३, युवा कर्मचार्‍यांनी चालवलेले मतदान केंद्र ३ व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या एका केंद्राचा समावेश आहे. मतदार संघातील एकूण मतदार संख्या ३ लाख ७ हजार ५१८ असून त्यात १ लाख ६९ हजार ८८६ पुरुष तर १ लाख ४७ हजार ७३२ महिला मतदारांचा समावेश आहे.

Share

-