‘वंचित’, काँग्रेसकडून डाॅ. कादरींना गळ:भाजपच्या मदतीसाठी एमआयएम कमकुवत उमेदवार देणार असल्याचा आरोप

गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात कमकुवत उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून मला डावलले जात आहे. इम्तियाज जलील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर संपर्क साधल्याचे कॉल रेकॉर्ड तपासा. माझ्याही फोनचे कॉल रेकॉर्ड तपासा. मी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना याबाबतत पत्र लिहून सर्व माहिती कळवली आहे. त्यामुळे मी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष गफार कादरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसच्या नेत्यांनी डाॅ. कादरी यांच्याशी संपर्क साधला. छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून एमआयएम कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार इम्तियाज जलील विधानसभा निवडणूक लढवतील, असे पक्षप्रमुख ओवेसी यांनी जाहीर केले. मात्र, त्यांचा मतदारसंघ जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर दोन निवडणुकांत रिंगणात उतरलेले डाॅ. कादरी यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह होते. इम्तियाज ‘पूर्व’मधून लढतील, अशी चर्चा जोर धरत आहे. आरोपांवर इम्तियाज यांनी प्रतिक्रिया देणे टाळले डाॅ. कादरी यांच्या आरोपांसंदर्भात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना मेसेजही पाठवले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सावेंच्या मदतीसाठी सर्वकाही माझा पराभव करण्यासाठी इम्तियाज यांच्या सूचनेनुसार समाजवादीने ‘पूर्व’ मध्ये उमेदवार दिला. सावे यांना मदत व्हावी म्हणून कमकुवत उमेदवार देण्याचा प्रयत्न होत आहे, असे आरोप डाॅ. कादरी यांनी केला.

Share

-