आरक्षण हातून जातानाही कोणी डरकाळी फोडत नाही:हीच खरी शोकांतिका, आदिवासी सत्ता संपादन महापरिषदेत आंबेडकरांची टीका

आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, एस.सी., ख्रिश्‍चन यांना उमेदवारी देण्याचे वंचित बहुजन आघाडीने ठरविले आहे. या उमेदवारांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे. ही विधानसभेची लढाई आहे हे लक्षात घ्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात वंचित बहुजन आघाडी प्रणीत एकलव्य आघाडीतर्फे तसेच सहभागी आदिवासी संघटना व पक्षांतर्फे आयोजित दुसऱ्या आदिवासी सत्ता संपादन महापरिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचित आघाडी व एकलव्य आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. २०२४ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुढची लोकसभेची निवडणूक पाच वर्षानंतर म्हणजे २०२९ मध्ये होईल. पण या कालावधीत तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी, आदिवासी यांचे आरक्षण धोक्यात आले आहे. याकडे अॅड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले. आदिवासींना स्वत:च्या हक्काचे रक्षण करावे लागेल. आरक्षणासाठी आज तुम्ही लढला नाही तर पुढे आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे आरक्षणाचे लाभार्थी व्हा. आरक्षण जात असतांनाही कोणी डरकाळी फोडत नाही, ही शोकांतिका असल्याचा घणाघात अॅड.आंबेडकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आदिवासी समाज बांधव हे निसर्गाला जपणारे आहे. निसर्गाचे प्रदुषण होऊ नये याची ते दक्षता घेतात. याच पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आदिवासींना एकत्र करण्याचे काम सुरू केले आहे. आता आपण एकत्र वाटचाल केली पाहिजे, आदिवासी संघटीत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सरकारी नोकरीमध्ये १ लाख २५ हजार आदिवासींच्या जागा भरायच्या आहेत. पण त्या भरल्या जात नाहीत. या जागा भरल्यानंतर आदिवासी समाजाची आर्थिक परिस्थिती बदलण्यास सुरूवात होईल,असेही अॅड.आंबेडकर म्हणाले. यावेळी पी.एस.जाधव, बिरसा मुंडा ब्रिगेडचे पी. के. वरमा, ज्ञानेश्‍वर भतगड, वंचितचे राज्य सदस्य चेतन गांगुर्डे, कैलास बर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी आरक्षणावर भर दिला. आदिवासींना सत्ताधारी बनविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जायचे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विधानसभेची बांधली मोट जिल्ह्याच्या विविध भागातून आदिवासी समाज बांधव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा, नांदगांव तालुका, मनमाड शहर तसेच एकलव्य आघाडी, एकलव्य परिषद, भारत आदिवासी पार्टी, गोंदवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी परिषद आदी संघटना यावेळी सहभागी झाल्या होत्या.

Share

-