अमरावतीच्या जीएमसीत 11 प्रवेश निश्चित:24 ऑक्टोबर ही शेवटची तारीख

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात (जीएमसी) गेल्या तीन दिवसांत ११ विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला प्रवेश घेतल्याचे अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. दरम्यान आजचा राऊंड तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला. उद्या, सोमवारपासून पुन्हा नियमित प्रक्रिया सुरु होणार असून २४ ऑक्टोबर हा प्रवेश निश्चित करण्याचा अंतीम दिवस आहे. अमरावतीत यावर्षीपासून सुरु झालेल्या ‘जीएमसी’त प्रवेशाचे हे पहिलेच वर्ष आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटीच्या इमारतीत हे महाविद्यालय व रुग्णालय सुरु होत आहे. दरम्यान आजपर्यंतचे सर्व राऊंड हे राष्ट्रीय पातळीवरील होते. त्यामुळे आजपर्यंत प्रवेश घेतलेले सर्व ११ विद्यार्थी परराज्यातील आहेत. यामध्ये राजस्थानचे आठ, दिल्लीचे दोन आणि मध्ये प्रदेशातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. उद्या, सोमवारपासून महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहेत. स्थानिक नागरिकांची सततची मागणी आणि राज्य सरकारने त्याला अनुसरुन घेतलेले सकारात्मक धोरण यामुळे अमरावतीत यावर्षीपासून जीएमसी सुरु झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपणार असून त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरु होतील, अशी माहिती आहे. अमरावती जिल्ह्यातही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, यासाठी अमरावतीकरांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी संघर्षात्मक पवित्रा घेतला होता. शेवटी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. त्याचे दृश्य स्वरुप लवकरच पुढे येणार आहे. हे आहे तांत्रिक कारण एमबीबीएस प्रवेशाचा आजचा राऊंड थांबण्यामागे सांगितले जाणारे तांत्रिक कारण न्यायालयीन आहे. अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गातील गोंड जातीच्या एका विद्यार्थीनीला पहिल्या राऊंडमध्ये ठाण्याच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. परंतु त्या विद्यार्थीनीला अमरावती विभागात प्रवेश हवा असल्याने त्यांनी दुसऱ्या राऊंडची प्रतीक्षा केली. या राऊंडमध्ये त्यांना अकोला येथील जीएमसी अलॉट झाले. परंतु व्हॅलीडीटीचा मुद्दा आडवा आल्याने प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्या विद्यार्थीनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचे द्वार ठोठावले. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आजचा राऊंड थांबविण्यात आला. दरम्यान अमरावतीच्या व्हॅलीडीटी कमीटीलाही न्यायालयाने त्या विद्यार्थीनीच्या प्रमाणपत्राबाबत विशिष्ट वेळेत निर्णय घेण्याचे आदेशित केले आहे.

Share

-