प्रसिद्ध व्हायोलिन वादक म्हैसुरू मंजुनाथ राष्ट्रीय अध्यक्षपदी:संस्कार भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा

जगप्रसिद्ध व्हायोलीन वादक डॉ. म्हैसूरू मंजुनाथ यांची संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून निवड झाली असून ज्येष्ठ अभिनेते नीतिश भारद्वाज, सीसीआरटीच्या पूर्व अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेमलता मोहन आणि विचारवंत डॉ. रवींद्र भारती यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजस्थानचे सूरबहारवादक डॉ. अश्विन दळवी राष्ट्रीय महामंत्री असतील. जयपूर, राजस्थान येथे प्रारंभ झालेल्या संस्कार भारतीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी तीन वर्षांकरीता राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नागपूरचे प्रसिद्ध वक्ते व लेखक आशुतोष अडोणी यांचा अखिल भारतीय मंत्री म्हणून कार्यकरिणीत समावेश करण्यात आला आहे. संस्कार भारतीचे नागपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत घरोटे यांच्याकडे पश्चिम क्षेत्र प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अभिजीत गोखले अखिल भारतीय संघटनमंत्री राहतील. वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्घाटन राजस्थानचे विख्यात चित्रकार पद्मश्री तिलक गीताई, प्रख्यात समाजसेवी पद्मश्री मुन्ना मास्टर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. संस्कार भारतीचे अध्यक्ष, प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या अखिल भारतीय साधारण सभेस विदर्भातून आशुतोष अडोणी, चंद्रकांत घरोटे यांच्यासह विदर्भ प्रांताध्यक्ष कांचन गडकरी (नागपूर), प्रांत महामंत्री विवेक कवठेकर (यवतमाळ), सह महामंत्री गजानन रानडे (नागपूर), सहकोश प्रमुख नीरज अडबे (नागपूर) पूर्व सहक्षेत्र प्रमुख अजय देशपांडे प्रामुख्याने उपस्थित आहेत. नूतन राष्ट्रीय कार्यकारिणीचे विदर्भ प्रांताच्या वतीने कलासाधकांनी अभिनंदन केले आहे.

Share

-