भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीणीवर हल्ला:हल्ल्यात अर्चना रोठे गंभीर जखमी, उपचारासाठी अमरावतीत दाखल
अमरावती येथील धामणगाव विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले सातेफळ फाट्यावर रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्चना रोठे गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी रात्री अर्चना रोठे प्रचार संपवून परतत असताना सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अर्चना रोठे यांची गाडी अडवत चारही बाजूने हल्ला केला. त्यांची एमएच 27 डीबी 5001 क्रमांकाची कार होती, या कारचा समोरचा काच देखील हल्लेखोरांनी तोडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अर्चना रोठे यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न देखील या हल्लेखोरांनी केला, मात्र अर्चना यांनी हा वार आपल्या हातवार झेलल्यामुळे त्यांच्या हाताची नस कापली गेली. जखमी झालेल्या अर्चना रोठे यांना तातडीने डॉ. ढोले यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना अमरावतीच्या रुग्णालयात हलविण्यात आले. अर्चना रोठे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना रोठे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर अंधारात पसार झाले. पोलिस आता या हल्लेखोरांचा शोध घेत असून येथील वातावरण देखील तापले आहे. या हल्ल्यानंतर प्रताप अडसड म्हणाले, या घटनेमुळे कार्यकर्त्यांनी घाबरू नये किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये. प्रत्येकाने आपले गाव सोडून इतर कुठेही जाऊ नये. हा संपूर्ण प्रकार आपण गोंधळ घालावा यासाठी विरोधकांनी रचलेला कट असू शकतो, अशी शंका प्रताप अडसड यांनी व्यक्त केली आहे. सर्वांनी आपापल्या घरात राहावे व मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढावे, असे आवाहन देखील प्रताप अडसड यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ला
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या वाहनावर पाच जणांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी ता. 18 मध्यरात्री दिड वाजता घडली आहे. असून यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. हेही वाचा