खुल्या चर्चेला या, नाहीतर पेग्विनची काळजी करीत बसा:धारावीच्या आरोपांवर आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन भाजपला धारेवर धरले आहे. धारावीत 300 एकर पुनर्विकासाचे टेंडर अदाणीला दिले असून मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदाणीच्या घशात घातली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या आरोपावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्तुत्तर दिले आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्ही या, नाहीतर राणी बागेत पेग्विनची काळजी करत बसा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी केलेली आरोप फेटाळून लावले आहेत. 1080 एकर आकडा आला कुठून? असा सवाल करत. उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही? असा प्रतिसवाल आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे. आम्ही खुल्या चर्चेसाठी तयार आहोत, तुम्ही या, असे आवाहनही शेलार यांनी आदित्य ठाकरेंना केले आहे. बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, खोटे बोलून पळ काढू नका, अशी टीकाही त्यांनी केली. नेमके काय म्हणाले आशिष शेलार? बुद्धिमान खोटारडे आदित्य ठाकरे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या.. खोटं बोलून पळ काढू नका! 1080 एकर आकडा आला कुठून? अदानीच्‍या नावावर 1080 एकर जागा चढली, सरकारने दिली याबाबत शासकीय कागद, कॅबिनेट निर्णय दाखवा…उलट धारावीतील नेचर पार्क 37 एकरचा भूखंड हडप करण्याचा डाव आहे की नाही? उत्तर द्या ! आम्ही खुल्या चर्चेला तयार आहोत.. तुम्ही या !! नाहीतर पेग्विनची काळजी करीत राणीच्या बागेत बसा ! असे आशिष शेलार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. आदित्य ठाकरेंचा आरोप काय?
मुंबईतील 1080 एकर जमीन, धारावी पुनर्विकासाच्या नावावर अदानी समूहाला मोफत दिली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. धारावीच्या बाहेर सुमारे 7,00,000 चौरस फुटांचे बांधकाम, यातून जवळपास 1,00,000 कोटींची कमाई होईल, मात्र, यातून मुंबईला कोणताही महसूल मिळणार नाही. धारावीतील दीड लाख कुटुंबांना अपात्र ठरवून मुलुंड, कुर्ला, देवनार, मढ, कांजूरमार्ग, भांडुप येथे घरे खरेदी केली जाणार आहेत. एकनाथ शिंदे आणि भाजपला मुंबईला महाराष्ट्रापासून तोडता येत नाही, मुंबई जिंकता येत नाही, त्यामुळे त्यांच्या मालकाला मुंबई फुकट देण्याचा हा त्यांचा उत्तम मार्ग आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर केली होती. हेही वाचा… ठाकरेंची धारावीच्या 37 एकरांवर नजर:निर्बुद्ध आदित्य ठाकरे हे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते, भाजप नेते आशिष शेलार यांचा घणाघात ​​​​​​​उद्धव ठाकरे गटाला धारावी येथील नेचर पार्कचा 37 एकरांचा भूखंड बळकवायचा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी गुरुवारी केला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख निर्बुद्ध असा करत ते शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते असल्याचाही आरोप केला. पूर्ण बातमी वाचा…

Share

-