विधानसभा सभागृहात कुस्ती होते की काय? असेच चित्र:जितेंद्र आव्हाड सत्ताधाऱ्यांवर संतापले; लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याचा सल्ला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत काल चांगलेच आरोप- प्रत्यारोप झाले. या सर्वांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर आदित्य ठाकरे बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र त्याच वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूच्या आमदारांनी चांगलाच गोंधळ घातला. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. मात्र या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्यांनी सभागृहाचे पावित्र्य जपण्याचा सल्ला सत्ताधारी पक्षाला दिला आहे. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून बहुमताच्या जोरावर सरकार विरोधी पक्षाला संपू शकतो, असा समज दिसत असल्याचे म्हटले आहे. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मात्र लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सगळे सभागृहात आलो आहोत. त्यामुळे हा कुस्तीचा फड नाही तर लोकशाहीचे मंदिर आहे. त्याचे पावित्र्य जपलेच पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. आज सभागृहात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केल्यानंतर जे काही झाले त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे, सत्ताधारी पक्षातील काही आमदार ज्या पद्धतीने वागत होते, हावभाव करीत होते; त्यावरून पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही विरोधी पक्षाला संपवू शकतो, असा एक समज त्यांच्यात दिसत होता आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू होती. लोकशाहीत विरोधी पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण, गेल्या काही दिवसांत दिसून येतेय की संख्याबळाच्या जोरावर विरोधकांना नेस्तनाबूत करायचे किंबहुना त्यांचा आवाजच उठू द्यायचा नाही, असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. हे आज सभागृहात प्रत्यक्ष पहायला मिळाले. सभागृहात कुस्ती होते की काय, असेच चित्र निर्माण झाले होते. जे महाराष्ट्राच्या विधानसभेत कधीच घडले नव्हते ते आता घडताना दिसतेय. लोकं नेहमी छगन भुजबळ यांची तुलना करतात. भुजबळ एकटे होते तरी ते सभागृह कसे डोक्यावर घ्यायचे, सभागृह बंद पाडायचे; होय, हे खरं आहे. सभागृह भुजबळ आपल्या बोटावर नाचवायचे. पण, भुजबळ जेव्हा विधानसभेत होते, तेव्हाची सभागृहातील परिपक्वता आता मात्र दिसत नाही. मला आठवतेय तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते. सभागृह चालविण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यातून सभागृहाचे पावित्र्य आणि लोकशाहीतील सभागृहाचे महत्व लोप पावतंय, हे आपल्या लक्षातच येत नाही. शेवटी सभागृह हे लोकशाहीचे मंदिर आहे. त्या मंदिरात आपण कसे वागायला हवे, याचे भान दोन्हीकडील लोकांनी सदस्यांनी ठेवायला हवे. खासकरून ते भान सत्ताधाऱ्यांनी अधिक ठेवायला हवे कारण ते सत्तेत आहेत. सत्तेत असूनही तुम्ही असे करणार असाल तर या सभागृहात बोलण्यालाच काही अर्थ उरत नाही. आज हे चित्र बघून पुढील पाच वर्षे कशी जाणार याचा विचार मी करतोय. लोकशाही रक्षणासाठी आपण सगळेच सभागृहात आलो आहोत. त्यामुळेच लोकशाहीचे रक्षण करणे ही आपली पहिली आणि शेवटची जबाबदारी आहे. जर लोकशाही आपण सुरक्षित ठेवली नाही तर या सभागृहाच्या पावित्र्यावरच आपण चिखलफेक करीत आहोत आणि ते या महाराष्ट्राला घातक ठरेल. महाराष्ट्राने एक चांगली अन् सुसंस्कृत लोकशाहीची परंपरा जपली आहे. ती परंपरा अशीच पुढे चालली पाहिजे, यासाठी प्रयत्न करायला हवेत. एक दुसर्‍याच्या अंगावर जाऊन आपण काय साध्य करणार आहोत. हा काही कुस्तीचा फड नव्हे. तर, हे लोकशाहीचे मंदिर आहे, त्याचे पावित्र्य जपलेच पाहिजे. सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांकरिता स्थगित झाले होते भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केलेल्या मतांवर चर्चा सुरु असताना सभागृहात गोंधळ सुरु झाला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणार असल्याचे म्हटले. मात्र, त्याच वेळी सत्ताधारी पक्षातील मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना विरोध दर्शवला. त्यामुळे सभागृहात या प्रकरणावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांकरिता स्थगित केले.

Share