निंबाळे येथे संतप्त ग्रामस्थांनी केला दोन तास रास्ता रोको:गावात तणाव; दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यानंतर मुलीसह वडिलास मारहाण
मोटारसायकलला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून वडील व मुलीला एका जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील निंबाळे येथे घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी तब्बल दोन ते अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. मागणी पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध केला. आयान बेग यास अटक करण्यात आल्याचे सांगितल्याने तणाव निवळला. वाघापूर येथील विश्वनाथ शिंदे हे आपल्या कन्येसह मोटरसायकल वरून संगमनेरकडे येत होते. निंबाळे फाटा येथे त्यांच्या गाडीला अयान आयाज बेग याने कट मारला. गाडीला कट का मारला, असा जाब विश्वनाथ शिंदे यांनी त्याला विचारला याचा राग आल्याने आयान याने शिंदे यांना मारहाण केली. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची वीस वर्षीय मुलगी गाडीच्या खाली उतरली. तिनेही या युवकाला जाब विचारला. त्याने या मुलीलाही मारहाण केली. वडील व मुलीला मारहाण झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. यामुळे घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आला. शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ही माहिती समजताच अनेक कार्यकर्ते निंबाळे येथे पोहोचले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ, मनसेचे उमेदवार योगेश परदेशी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अभिजित घाडगे, काँग्रेस नेते सुरेश थोरात, सुनील थोरात, ॲड. नानासाहेब थोरात, बजरंग दलाचे तालुका कार्यवाह कुलदीप ठाकूर, मनसेचे शहराध्यक्ष तुषार ठाकूर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या कार्यकर्त्यांनी निंबाळे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा मनसेचे उमेदवार योगेश सूर्यवंशी यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान, गावात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आरोपीला अटक केल्यानंतर आंदोलन घेण्यात आले मागे आरोपीला अटक होईपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.