बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:पोलिसांनी बळजबरीने आमचा जबाब घेतला, आरोपींचे घुमजाव; कोर्टात केला अर्ज

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. मुख्य शुटरसह 8 ते 9 आरोपींनी घुमजाव केले आहे. पोलिसांनी नोंदवलेलला जबाब रद्द करावा, अशी मागणी या आरोपींनी एका अर्जाद्वारे कोर्टात केली. पोलिसांनी जबरदस्तीने आपला जबाब नोंदवल्याचे या आरोपींनी अर्जात म्हटले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 3 आरोपींना पकडण्यात अद्यापही यश आले नाही. आमची पथके आरोपींचा शोधा घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या सुनावणी दरम्यान प्रमुख शुटर शिवकुमार गौतम याने पोलिसांनी आपला जबाब बळजबरीने नोंदवला, असा आरोपी केला. तसेच हा जबाब मागे घेण्यात यावा, अशी विनंती एका अर्जाद्वारे कोर्टाला केली. शिवकुमार गौतम याच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे पूर्व भागात 12 ऑक्टोबर 2024 रोजी तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली होती. या प्रकरणात बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी घेतली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 26 आरोपींना अटक केली आहे. तर 3 आरोपी अद्याप फरार आहेत. झीशान सिद्दीकींच्या जबाबात अनेक मोठ्या नावांचा उल्लेख
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झीशान सिद्दीकी यांनी पोलिसांत जबाब नोंदवला होता. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे असू शकतात, अशी शक्यता झीशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली. वांद्रे झोपडपट्टी विकास योजनेशी संबंधित वादांचाही या हत्येच्या तपासात समावेश करण्यात यावा, असे झीशान यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक मोठ्या नावांचा उल्लेख केला. झीशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात भाजप नेते मोहीत कंबोज, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच बिल्डर पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकीत विकासकांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय पृथ्वी चव्हाणने माझ्या वडिलांसोबत बोलताना असभ्य भाषा वापरली असल्याचा उल्लेखही केला होता.

Share