बाळू धानोरकर यांचा घातपात?:आईच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खबबळ; मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी

काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाची जाण्याची वेळ नव्हती, त्याच्या मृत्यू मागे घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे. निवडणुकीनंतर बाळू धानोरकर यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. बाळू धानोरकर यांच्या घातपातामागे कोण आहे? याची चौकशी करण्याची मागणी त्यांच्या आई वत्सला धानोरकर यांनी केली आहे. मात्र या मागे कोण? हे त्यांनी सांगितले नाही. वास्तविक बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर याच मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे वत्सला धानोरकर यांनी आपल्या मुलाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपामागे राजकीय किनार आहे का? याबाबत मतदारसंघात चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार राज्यातच नव्हे तर देशात मोदी लाट असताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला. आणि ते देखील केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांचा पराभव करत. यावरुनच बाळू धानोरकर यांची मतदार संघातील कामाची ओळख होते. राज्यात काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे वाटत असतानाच बाळू धानोरकर यांनी अनपेक्षित विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजय मिळवत त्यांनी काँग्रेसचे अस्थित्त्व टिकवून ठेवले होते. आधी आमदार नंतर खासदार बाळू धानोरकर हे नाव कायम चर्चेत राहिलेले नाव होते. त्यांचा जन्म 4 मे 1975 रोजी यवतमाळमध्ये झाला होता. त्यांनी कला आणि कृषी शाखेचे शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी कपड्यांचे दुकान देखील सुरु केले. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी सुरू करुन या व्यवसायातही नशीब आजमवले. इतकच नाही तर त्यांनी भद्रावतीमध्ये बारही सुरु केला होता. त्याच काळात त्यांनी राजकारणात प्रवेश करत वरोरा विधानसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्त्व केले. आधी आमदार नंतर खासदार असा प्रवास करत त्यांनी कमी कालावधीत यश मिळवले होते. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश 2019 च्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले. त्या आधी 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यात दोन खासदार निवडून आले होते. मात्र, 2019 मध्ये एकही खासदार निवडून येणार नाही, असे प्रत्येकालाच वाटत होते. इतकच नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही तशीच अपेक्षा होती. पण ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये विजय मिळवून पक्षाची लाज राखली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मैदानात उतरण्याची तयारी खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली होती. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे बाळू धानोरकर यांनी म्हटले होते. आगामी तीन वर्षांच्या कालखंडात धानोरकर तुम्ही वाराणसीत जा, असा आदेश पक्षाने द्यावा. जर मी गेलो नाही आणि मोदींचा ट्रम्प केला नाही तर बाळू धानोरकर नाव सांगणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. प्रतिभा धानोरकर यांनीही केला होता आरोप पक्षांतर्गत विरोधामुळेच माझे पती खासदार बाळू धानोरकर यांचा जीव गेला, असा खळबळजनक आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला होता. तर त्यांचा जीव घेतला आता ते माझ्या मागे लागले आहेत, असा आरोप त्यांनी काँग्रेस नेत्यावर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या वेळी त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. त्यानंतर त्यांनी हा आरोप केला होता. विरोधामुळे एक जीव गेला आता दुसरा जीव जाणार नाही, याची काळजी मी घेईन, असे प्रतिभा धानोरकर यांनी ठणकावून सांगितले होते. मात्र, पक्षाच्या वतीने त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयी देखील झाल्या आहेत. वडिलांनंतर लगेचच मुलाचेही निधन 27 मे रोजी बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली होती. आजारपणामुळे 28 मे रोजी वडिलांच्या अंत्यविधीमध्येही बाळू धानोरकर उपस्थित राहू शकले नव्हते. चंद्रपूरमधील त्यांचे मूळ गाव भद्रावती येथे हा अंत्यविधी पार पडला होता. सुरुवातीला बाळू धानोरकर यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ दिल्ली येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. चंद्रपूरहून एअर अ‌ॅम्बुलन्सने त्यांना दिल्ली येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. वडिलानंतर लगेचच मुलाचे निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

Share

-