विधानसभा निवडणुकीत बीड सर्वात जास्त चर्चेत:बोगस मतदान तर कुठे थेट हाणामारी, जिल्ह्यात कुठे कुठे काय झाले?

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली. मात्र दुपारनंतर परळी व आष्टी येथील मतदान केंद्रांवर घोळ सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. परळी येथील मतदान केंद्राच्या बाहेरच बोटाला शाई लाऊन परत पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर आष्टी येथे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. जलालपूरच्या मतदान केंद्रावर बोगस मतदान
बीड जिल्ह्यातील परळी येथील जलालपूर येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचे बोलले जात आहे. मतदान केंद्राच्या बाहेरच बोटाला शाई लाऊन माघारी पाठवत असल्याची तक्रार येथील महिला मतदारांनी केली आहे. बोटाला शाई लाऊन स्वतःच बटन दाबत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच हाताला धरूनच बटन दाबत असल्याची देखील तक्रार करण्यात येत आहे. अनेक महिलांना मतदान करू दिले नसल्याचा देखील गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे येथील अधिकारी व यंत्रणा दडपशाही खाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. धर्मपुरीत मतदान केंद्रावरील सीसीटीव्हीची पीन काढली
परळी मतदारसंघातीलच धर्मपुरी गावात देखील मतदान केंद्रांवर असाच काहीसा प्रकार घडला आहे. धर्मपुरी या गावातील मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पीन काढून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी बोगस मतदान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. आष्टीत भाजप व शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
बीडच्याच आष्टी येथील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गावात भाजप उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही करणांवरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत गेल्याचे समोर आले आहे. सुरेश धस यांच्या समर्थकांना मेहबूब शेख यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात काही काळ ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Share