बीडमध्ये आकाशातून पडलेल्या दगडांचे गूढ उलगडले?:आशनीपाताचा प्रकार असल्याचे खगोल शास्त्रज्ञांचे मत, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. येथील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकही दहशतीखाली होतेच त्यात आता आकाशातून दगड पडल्याची घटना समोर आल्याने दहशतीत आणखी भर पडली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील लिमगावात आकाशातून एका शेतकाऱ्याच्या घरावर अचानक अचानक दगड पडले. हे दगड एवढ्या जोरात पडले की त्यातला एक दगड घराच्या पत्राला छिद्र पाडून घरात येऊन पडला. हा आशनीपाताचा प्रकार असावा, असे खगोल अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी म्हटले आहे. मंगळवारी दुपारच्या दरम्यान आकाशात मोठा आवाज होऊन दोन ते चार दगड पडले असल्याची घटना मौजे खळवट लिमगाव येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाचे भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमने पाहणी केली. अभ्यासकांनी दगडाची पाहणी केल्यानंतर 80 सेंटीमीटर आकाराचे हे दगड उल्कापिंड असल्याचे सांगितले आहे. खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी हा सगळा आशनीपाताचा प्रकार असावा असे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर, अभिनव विटेकर यांच्या टीमने पाहणी केली होती. तेव्हा हा आवाज कशामुळे झाला? दगड पडण्याचे कारण काय? याचे गूढ काय ते लवकरच कळवू, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली होती. दोन दगड पडले असून यातील एक दगड तहसीलदाराकडून घेतला आहे, तर दूसरा एक दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे सांगितले होते. गावातील भिकाजी अंबुरे यांच्या घरावर एक दगड पडला होता. हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून दगड थेट घरात पडला होता. तर इतर दोन दगड हे शेतात पडले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली होती. हा दगड पडताना इथे खेळणाऱ्या मुलांनी पाहिले होते. जेव्हा शास्त्रज्ञांची टीम पाहणी करण्यासाठी आली होती तेव्हा अधिकाऱ्यांना व शास्त्रज्ञांना दगड कसा पडला हे सांगताना येथील मुलांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह दिसून आला.

Share