भैय्याजी जोशी यांनी माफी मागायला हवी:अनिल परब आक्रमक; म्हणाले- ‘शिवाजी महाराजांचा आणि मराठीचा अपमान सहन करणार नाही’
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे असे आवश्यक नसल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी केले होते. यावर विधानपरिषदेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब चांगलेच आक्रमक झाले आहेत. भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच मराठी भाषेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या संदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी समजलीच पाहिजे. त्याने किमान मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. परंतु ज्या पद्धतीचे लेबल, लावले जात आहे. किंवा मराठी माणसाला बाजूला करून गुजराती घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच त्यासाठी गुजरातीकरण केले जात आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे परब यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करून त्यांनी माफी मागावी अशी मागणी परब यांनी केली आहे. सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषे संदर्भात केल्याच्या वक्तव्यावर विधान परिषदेमध्ये अनेक प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यात केवळ परब यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यावरुन देखील परब यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मात्र या सर्वांमध्ये सहभागृह बोलण्याची संधी दिली जात नसल्यावरुन विरोधी पक्षातील सदस्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. विधानसभेचे कामकाज देखील पाच मिनिटांसाठी स्थगित या आधी विधानसभेमध्ये देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी याच मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देखील दिले. त्यानंतर देखील सहभागृहात चांगलाच गोंधळ झाला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज देखील पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. भैय्याजी जोशी यांचे नेमके वक्तव्य काय? भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, असे ते म्हणाले होते. यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे.