भास्कर इंटरव्ह्यू:बांगलादेशचा विद्यार्थी नेता म्हणाला ‘भारतीय नेत्यांनी द्वेष पसरवू नये, हसीना यांना परत पाठवा’
२६ वर्षीय आसिफ महमूद वर्षभरापूर्वी सामान्य विद्यार्थी होता. त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात ऑगस्टमध्ये झालेल्या विरोधी आंदोलनाचा चेहरा झाला. आता आसिफ महमूद बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये सल्लागार आहे. त्याच्याकडे यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे. भारत हसीना यांची मदत करत असल्याने आमचे लोक नाराज आहेत, असे त्याचे म्हणणे. शेख हसीना तेथे राहून भाषण देत आहेत. त्यांना परत बांगलादेशमध्ये पाठवा. वाचा मुलाखत… आताच्या सरकारला ४ महिने झाले. आंदोलनावर विचार केला, तसे झाले? आम्ही १० प्रकारचे सुधारणा आयोग स्थापन केले. त्याला ३ महिने झाले. अहवालाची प्रतीक्षा आहे. त्याच आधारावर काम करू. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले हाेताहेत? अल्पसंख्याकांवर हल्ले राजकीय मुद्दा आहे. शेख हसीना सरकारमध्येही अल्पसंख्याकांवर हल्ले होत होते. मागील दुर्गापूजेत हिंदूंवर अनेक हल्ले झाले हाेते. या वेळी दुर्गापूजेचे आयोजन खूप शांततेत झाले. शेख हसीना नकारात्मक कथा पसरवताहेत. ढाक्यात इस्कॉन अन् भाजपविरुद्ध रोज आंदोलन होत आहे. का? हा विरोध विशिष्ट पक्षाविरुद्ध नाही. भाजप भारतात सरकार चालवते. त्यांचा जाहीरनामा हिंदू जाहीरनामा आहे. बांगलादेशातील लोकांना हिंदुत्व आवडत नाही. आम्ही हिंदुत्वाविरुद्ध आहोत. बांगलादेश-पाकची जवळीक वाढतेय. यातून भारताला काय संदेश देणार आहात? बांगलादेश विकसनशील देश आहे. आम्हाला चीन, पाश्चिमात्य, शेजाऱ्यांच्या मदतीची गरज आहे. इस्लामिक पक्ष शरिया लागू करू म्हणतात. यावर आपले मत काय? हे शक्य नाही. १५ वर्षांत त्यांनी निवडणूक लढली. हे एकटे सत्तेत येऊ शकत नाहीत. आंदोलन आरक्षणासाठी होते, हा मुजीबुर्रहमान विरोध कसा झाला? आम्ही कोटा हटवण्यासाठी शांततेने आंदोलन करत होतो. अवामी सरकारने पहिल्या टप्प्यात ३०० लोक मारले. तेव्हा निर्णय घेतला की हे मारेकरी सरकार सहन करणार नाही. राष्ट्रीय मानके न मानणे, हे का? बांगलादेशाने १९४७,१९७१ आणि १९९० मध्ये युद्ध लढले. कुणी एक राष्ट्रपिता होऊ शकत नाही. मुजीबुर्रहमान संस्थापकांपैकी एक. मात्र ते एकमेव राष्ट्रपिता होऊ शकत नाहीत.