भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी पैसे वाटले:MIM च्या इम्तियाज जलील यांचा थेट आरोप; VIDEO दाखवत केली कारवाईची मागणी
भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अतुल सावे यांनी निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. अतुल सावे यांच्या विरोधात झालेली इम्तियाज जलील हे देखील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार आहेत. या बाबतचे काही व्हिडिओ देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाला यासंबंधीचे व्हिडिओ आपण पाठवले असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या संदर्भातील त्याच इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ दाखवत अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जवाहर नगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात मुस्लिम महिलांना आणून पैसे वाटप करण्यात आले असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील त्यांनी दाखवला. या ठिकाणी मुस्लिम महिलांना पैसे देऊन त्यांच्या बोटांना शाई लावली जात होती, असा आरोप जलील यांनी केला आहे. यात त्यांनी ॲड. अरविंद डोणगावकर यांच्यावर आरोप केले आहेत. डोणगावकर हे भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. जालिंदर शेंडगे यांनी बोगस महिला मतदानासाठी आणल्या दुसरीकडे मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात आणून बोगस मतदान करून घेण्यात आले असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी दुसरा एक व्हिडिओ देखील पत्रकारांना दाखवला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जालिंदर शेंडगे यांनी बोगस महिला मतदानासाठी आणल्या होत्या, असा आरोप जलील यांनी केला आहे. आंबेडकर नगर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला असून तेथील नागरिकांनीच मला या बाबतची माहिती दिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.